देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री की गुजरातचे?, सुषमा अंधारेंचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 01:54 PM2022-11-16T13:54:06+5:302022-11-16T16:25:39+5:30
फडणवीस सूडबुद्धीचे, पक्षपाती राजकारण करत असल्याचा आरोप
उद्धव गोडसे
कोल्हापूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून महाराष्ट्रातील मोठे प्रकल्प गुजरातला पळवले जात असल्याचा आरोप करत, फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत की गुजरातचे? असा सवाल शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला. आज, बुधवारी (दि. १६) कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाची सध्या राज्यभरात महाप्रबोधन यात्रा सुरू आहे. या यात्रेच्या निमित्ताने सुषमा अंधारे कोल्हापुरात आल्या आहेत. काल, कुरुंदवाड येथे त्यांची जाहीर सभा झाली. आज, बुधवारी त्यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर निशाणा साधला. 'महाराष्ट्रातील मोठे प्रकल्प गुजरातला पळवले जात आहेत. मुंबईचे आर्थिक महत्व कमी करण्याचा डाव भाजपकडून सुरू आहे. फडणवीस यांच्या पुढाकारातूनच महाराष्ट्राला कंगाल केले जात आहे, त्यामुळे फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत की गुजरातचे आहेत?' असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. तसेच भाजपची महाराष्ट्रद्रोही भूमिका महाप्रबोधन यात्रेतून उघड करत राहणार, असा इशाराही त्यांनी दिला.
महाराष्ट्रात २०२३ मध्ये मध्यावधी निवडणुका लागतील, असा पुनरुच्चार सुषमा अंधारे यांनी केला. शिंदे गटातील फुटीर आमदारांच्या अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत, त्यामुळे आमदारांमधील अस्वस्थता वाढली आहे. त्यातून शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल, असेही त्या म्हणाल्या.
फडणवीस सूडबुद्धीचे, पक्षपाती राजकारण करत असल्याचा आरोप
आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावरील कारवाईवर बोलताना अंधारे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सूडबुद्धीचे आणि पक्षपाती राजकारण करत असल्याचा आरोप केला. पत्रकार परिषदेसाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांच्यासह डॉ. सुजित मिणचेकर, रविकरिण इंगवले, आदी उपस्थित होते.