फडणवीस शिवसेनेत येतायत का? संभाजीराजेंवरून संजय राऊतांची विचारणा...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 12:33 PM2022-05-28T12:33:14+5:302022-05-28T16:13:20+5:30
संभाजीराजे आणि शिवसेना यांच्यातील हा संबंध असल्याचे सांगत यात इतरांनी चोंबडेपणा करु नये असे सांगितले.
कोल्हापूर : महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावणारे आणि शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत आज कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. शिवसेनेने सुरु केलेल्या शिवसंपर्क अभियानअंतर्गत आज त्यांची जाहीर सभा होणार आहे. याआधी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत असताना राज्यसभा निवडणुकीवरुन सुरु असलेल्या राजकीय घडामोडीसह विविध मुद्यावर भाष्य केले.
संभाजीराजेंनी काल, पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शब्द मोडल्याचा आरोप केला. यावरुन शिवसेनेने प्रत्युत्तर देखील दिले. आज याच मुद्यावर माध्यमांनी राऊतांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण केला जातोय तो चुकीचा आहे. ती शिवसेनेची जागा आहे. त्या जागेवर शिवसेनेचाच उमेदवार आणायचे हे ठरलं होत. पुरस्कृत बाबत सहकाऱ्यांशी बोलावे लागेल असेही मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजेंना सांगितले होते. तो विषय संपला असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्टच सांगितले.
फडणवीस आमच्या पक्षात येतात का?
संभाजीराजेंच्या उमेदवारींवरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली होती. यावरुन राऊत म्हणाले यासर्व घडामोडीत त्यांचा संबंध काय? नसेल त्यांनी ४२ मते द्यावी असे सांगत आम्ही त्यांना याबाबत उत्तर का द्यायची असा प्रतिसवालच केला. आमच्या पक्षासंदर्भातील निर्णयात आम्ही त्यांना उत्तर द्यायला फडणवीस आमच्या पक्षात येतात का असा टोला लगावला.
कोणता तरी पक्ष धरावाच लागतो
राजकारणात करिअर करायचं असेल तर कोणता तरी पक्ष धरावाच लागतो. राजे, महाराजे, संस्थानिक आहेत त्यांना कोणता तरी पक्ष धरावाच लागतो असे सांगत त्यांनी राजस्थान, जयपूर राजघराण्याचे उदाहरण देखील दिले.
इतरांनी चोंबडेपणा करु नये
राज्यसभा उमेदवारीवरुन संभाजीराजेंना शिवसेनेने पाठिंबा दिला नसल्याने भाजपकडून जोरदार टीका केली जात आहे. यावरुन प्रश्न विचारला असता राऊतांनी हा विषय संभाजीराजे आणि शिवसेना यांच्यातील असल्याचे सांगत यात इतरांनी चोंबडेपणा करु नये असे सांगितले.