देवगड हापूसला ‘जी. आय.’ मानांकन
By Admin | Published: April 20, 2017 10:49 PM2017-04-20T22:49:56+5:302017-04-20T22:49:56+5:30
स्वतंत्र ब्रँड : पाच वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर मिळाला हिरवा कंदील
देवगड : देवगड हापूसला स्वत:ची ओळख प्राप्त होणारे ‘जी. आय.’ मानांकन मिळाले असून देवगड हापूसच्या नावावर आता अन्य कोणत्याही आंब्याची विक्री केली जाणार नाही. गेल्या पाच वर्षांच्या प्रयत्नांनंतर देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने केलेल्या जी. आय. मानांकनाच्या मागणीला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. जी. आय. मानांकनासाठी गुरुवारी मुंबई येथे सुनावणीमध्ये देवगड हापूसला मान्यता देण्यात आली असून ‘देवगड हापूस’ हा स्वतंत्र ब्रॅण्ड निर्माण झाला आहे.
हापूस आंब्याच्या जी. आय. मानांकनासाठी तीन अर्ज कंट्रोलर जनरल आॅफ पेटंट या राष्ट्रीय संस्थेकडे रत्नागिरी हापूस, दापोली कृषी विद्यापीठामार्फत हापूस व देवगड तालुका आंबा उत्पादक संघाच्यावतीने देवगड हापूस असे तीन अर्ज मानांकनासाठी दाखल करण्यात आले होते. दापोली कोकण कृषी विद्यापीठामार्फत ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या भागातील आंब्याला हापूस हे मानांकन देण्याबाबत अर्ज केला होता.
देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार अॅड. अजित गोगटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी देवगड हापूसला जी. आय. मानांकन मिळविण्यासाठी पाच वर्षे प्रयत्न सुरू ठेवले. देवगड आंबा उत्पादक सहकारी संस्थेचे मार्केटिंग सल्लागार ओंकार सप्रे यांनी हे मानांकन मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
देवगड हापूसच्या नावाखाली कर्नाटक, मद्रास व महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांमधील आंबा विक्री केला जात होता. यामुळे देवगड हापूसची एकप्रकारे बदनामी होत होती. देवगड हापूस हा जगप्रसिद्ध आंबा असून, या आंब्याची चव व दर्जा देशात कुठल्याही आंब्याला नाही. त्यामुळे देवगड हापूसला चांगला भाव आहे. याचाच फायदा घेऊन कर्नाटकातील आंबा देवगड हापूसच्या नावाखाली विकून लोकांची दिशाभूल करून काही विक्रेते हे देवगड हापूससारख्या कर्नाटक आंब्याला भाव मिळवून घेत आहेत. देवगड हापूसला जी. आय. मानांकन मिळाल्यामुळे देवगड हापूसच्या नावाखाली केली जाणारी आंबा विक्री रोखली जाणार आहे. देवगड हापूसला आता देशाबाहेरही देवगड हापूस या नावानेच हा आंबा विकला जाणार आहे. (प्रतिनिधी)
देवगड नाव वापरून दुसरा आंबा विकल्यास गुन्हा
देवगड हापूस आंब्याला जी. आय. मानांकन मिळाल्यामुळे ग्राहकांना आता यापुढे खात्रीशीर देवगड हापूस आंबा उपलब्ध होणार आहे. देवगड हापूस आंब्याच्या नावावर अन्य कुणी विक्री करण्याचा प्रयत्न केल्यास तो गुन्हा ठरू शकतो. देवगड हापूसच्या नावाखाली कर्नाटक हापूस व अन्य हापूस आंबे विक्री केले जात होते. याला आता आळा बसणार आहे. जी. आय. मानांकनामुळे विशिष्ट ब्रॅण्ड देवगड हापूसला असणार आहे. त्यामुळे ग्राहकांनाही हा ब्रॅण्ड पाहूनच आंबा घेता येणार आहे.