‘देवदास’च्या कहाणीतून चर्चेत आला ‘देवमाणूस’--मनोरुग्णांचा वाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 12:28 AM2018-06-14T00:28:32+5:302018-06-14T00:28:32+5:30
जहॉँगीर शेख।
कागल : गेली सतरा ते अठरा वर्षे कागल शहराचा एक घटक झालेला ‘देवदास’ हा मनोरुग्ण योग्य उपचारांमुळे नॉर्मल बनून आपल्या पश्चिम बंगालमधील गावी परत गेला. याबद्दलचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर कागलकरांची ‘देवदास’च्या प्रति असणारी हुरहूर ठळक झाली. मात्र, देवदासच्या या कहाणीतून अधिकच प्रकाशात आला मनोरुग्णांच्यासाठीचा देवमाणूस.
पेरणोली (ता. आजरा) येथील अमित प्रभा वसंत देवदासच्या वृत्तामुळे ‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव तर झालाच; पण त्यापेक्षा अधिक शुभेच्छा बरसल्या त्या ‘माणुसकी’ फौंडेशनवर, अमित वसंतवर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर. ‘जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे’ असे म्हणतात.
त्याचप्रमाणे जगी मनोरुग्णांना कोणी नाही त्यास अमित आणि त्याचे सहकारी आहेत, असेच एकूण कार्यही ध्येयासक्त युवक करीत आहेत. अमित हा तर जिथे माणुसकीची गरज आहे तेथे हजर होणे, हे ब्रीद घेऊन गेली आठ वर्षे जगत आहे. त्याने नोकरी, घरदार, प्रपंच त्यागून पूर्णवेळ समाजसेवा हे व्रत घेतले आहे. सुरुवातीला डोंगरदºयातील धनगरवाडे आणि तेथील लोकांची सेवा, असे कार्य सुरू झाले. मात्र, एका जखमी मनोरुग्णावर उपचाासाठी कोणतेही खासगी रुग्णालय तयार होत नव्हते. या घटनेने हा उच्चशिक्षित युवक अस्वस्थ बनला आणि मग सुरू झाली ही मनोरुग्णांना ‘मनोयात्री’ मानून त्यांची सेवा करण्याची कहाणी. मनोरुग्णांना आपल्या घरी नेऊन त्यांना स्वच्छ करून दवाखान्यात नेण्यापासून त्याचे केशकर्तन, प्राथमिक उपचारही ते करतात. कागलच्या ‘देवदास’च्या कहाणीने या देवमाणसाची कहाणीही चर्चेत आली आहे.
रुग्णावाहिकेची गरज
कर्जत येथील डॉ. भरत वाटवाणी हे मानसोपचारतज्ज्ञ, माणुसकी फौंडेशनकडून आलेल्या मनोरुग्णांवर कर्जतपर्यंत नेणे, त्यांच्यावर प्राथमिक उपचार करणे यासाठी दरवेळी रुग्णवाहिका शोधावी लागते. कर्जतपर्यंतचे भाडे देण्यासाठी पैशांचा खूप मोठा प्रश्न निर्माण होतो. त्यातही जखमी, विक्षिप्त, संतप्त मनोरुग्णांना नेण्यासाठी खासगी रुग्णवाहिकाही नकार देतात. म्हणून आज माणुसकी फौंडेशनला एका रुग्णवाहिकेची गरज आहे. समाजाने अमित प्रभा वसंत यांच्या या नि:स्वार्थी कार्याला दातृत्व दाखवित मदत करण्याची गरज आहे. आम्ही त्यासाठी प्रयत्न करीत आहोत. दानशूर लोकांनीही मदत करावी, असे आवाहन या फौंडेशनचे वीरेंद्र मोरबाळे यांनी केले आहे.
तीन वर्षांत १७० मनोरुग्णांवर उपचार
अमित प्रभा वसंत यांनी हे कार्य सुरू केल्यापासून तीन वर्षांत १७० मनोरुग्णांवर उपचार केले आहेत. त्यापैकी ६७ मनोरुग्ण बरे होऊन आपापल्या घरी गेले आहेत. नेपाळ, बिहार, कर्नाटक, राजस्थान अशा विविध ठिकाणांच्या या मनोरुग्णांच्या कहाण्या हृदयस्पर्शी आहेत. त्याचबरोबर सोलापूर, पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर येथून त्यांना या कामासाठी नि:स्पृह कार्यकर्तेही लाभले आहेत. फेसबुक पेजवर ही सर्व माहिती उपलब्ध आहे.