भाविकांसाठी खुशखबर! तीन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अंबाबाईचे जवळून दर्शन घेता येणार
By इंदुमती सूर्यवंशी | Published: August 28, 2023 01:36 PM2023-08-28T13:36:43+5:302023-08-28T13:42:49+5:30
कोरोना काळात पितळी उंबऱ्याच्या आतून दर्शनाची सोय बंद करण्यात आली होती
कोल्हापूर : तीन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर उद्या, मंगळवारपासून करवीर निवासिनी श्री अंबाबाई भक्तांना देवीचे जवळून दर्शन घेता येणार आहे. कोरोना काळात बंद केलेले पितळी उंबऱ्याच्या आतून दर्शनाला परवानगी देण्यात आली असून पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी ही घोषणा केली. गर्दीचे दिवस वगळता वर्षभर ही सुविधा सुरू राहणार आहे.
कोरोनाने २०२० साली थैमान सुरू केले त्यावेळी सोशल डिस्टन्सिंगअंतर्गत अंबाबाई मंदिरातील भाविकांसाठीही काही अटी व नियम घालण्यात आले. त्यानुसार भाविकांसाठी पितळी उंबऱ्याच्या आतून दर्शनाची सोय बंद करून शंखतीर्थ चौकातून मुख दर्शन सुरू झाले. कोरोना संपल्यानंतरही आतून दर्शन सुरू झाले नाही. दुसरीकडे देवस्थान समिती व श्रीपूजकांकडून आलेल्या विशिष्ट भाविकांना आत नेऊन दर्शन घडवण्यात येत असल्याने वारंवार वादाचे प्रसंग घडत होते.
देवीच्याच दारात आमच्यावर अन्याय होतोय अशा शब्दात तीव्र नाराजी व्यक्त करत आतून दर्शन सुरू करण्याची मागणी हाेत होती. अखेर पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी सकाळी मंदिरातील विकासकामांच्या उदघाटनानंतर ही घोषणा केली. काेरोना काळात पितळी उंबऱ्याच्याआतून बंद केलेले अंबाबाई दर्शन आज मंगळवारपासून सुरू होत आहे. गर्दीचे दिवस वगळता भाविकांना अंबाबाईचे अधिक जवळून दर्शन घेता येईल ही सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे असे ते म्हणाले.