देवस्थान जमिनीवर मालकी हक्क द्या
By admin | Published: March 28, 2016 12:41 AM2016-03-28T00:41:21+5:302016-03-28T00:44:19+5:30
संतराम पाटील : शेतकरी मेळाव्यात ठराव
कोल्हापूर : गेली अनेक वर्षे कसत असलेल्या देवस्थानच्या जमिनीवर संबंधित शेतकऱ्यांना मालकी हक्क द्या, संघटनेशी चर्चा केल्याशिवाय समितीच्या शिफारशी लागू करू नयेत, असे ठराव महाराष्ट्र राज्य देवस्थान इनाम जमीनधारक शेतकरी संघटनेच्या मेळाव्यात करण्यात आले. इनाम जमीनधारक शेतकऱ्यांचा रविवारी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात मेळावा झाला. अध्यक्षस्थानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतराम पाटील होते.
देवस्थान जमिनीच्या मालकी हक्कांसाठी गेली पंधरा वर्षे संघर्ष सुरू असून, त्याला आता कुठेतरी यश येत असल्याचे सांगत संतराम पाटील म्हणाले, यश येते म्हटल्यावर अनेक मंडळी श्रेयासाठी पुढे येत आहेत. आम्हाला कोणत्याही गोेष्टीचे श्रेय घ्यायचे नाही; पण या शेतकऱ्यांचा प्रश्न सुटला पाहिजे, या हेतूने १९९९ सालापासून काम करत आहोत. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी देवस्थान जमिनीबाबत विचारविनिमय करण्यासाठी समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे; पण या समितीवर संघटनेचा एक प्रतिनिधी घ्यावा, जेणेकरून या शेतकऱ्यांची दुखणी त्यांना समजतील. सरकारची पावले चांगल्या दिशेने पडत असल्याने इनामी जमिनीबाबत सरकार निश्चितच चांगला निर्णय घेईल. चौकशी समितीच्या शिफारशी लागू करण्यापूर्वी संघटनेशी चर्चा करावी अन्यथा सरकारलाही ताकद दाखवावी लागेल, असा इशारा पाटील यांनी दिला.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कारभारावर सडकून टीका करताना संघटनेचे सचिव प्रा. वसंत चांदूरकर म्हणाले, जमिनी कसून सरकारला आम्ही खंड कशासाठी भरायचा? पाच जिल्ह्यांतील शेतकरी शेकडो किलोमीटरवरून खंड जमा करण्यासाठी येतात; पण देवस्थान समितीत लिपिकच नाही; त्यामुळे अनेक वेळा खंड भरता येत नाही; पण त्यासाठी दंड आकारला जातो., हे अन्यायी असल्याचे सांगत इतर अधिकारातून मालकी हक्काच्या जमिनी व्हाव्यात एवढीच मागणी असल्याचे प्रा. चांदूरकर यांनी सांगितले. अनंत चौगुले, राजेंद्र माने, मदन मस्के, आदींनी मनोगत व्यक्त केले. तुळसाराम पाटील, निवृत्ती बच्चे, बाबूराव कदम, रघुनाथ भोसले, किरण पाटील, सुनीता कोरे, राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते. प्रकाश कांबळे यांनी आभार मानले.