नवरात्रौत्सवाच्या पूर्वसंध्येलाच अंबाबाई मंदिर गजबजले, तोफेच्या सलामीने होईल घटस्थापना
By इंदुमती सूर्यवंशी | Published: October 14, 2023 07:04 PM2023-10-14T19:04:40+5:302023-10-14T19:05:56+5:30
नवरात्रौत्सवात भाविकांना अंबाबाईची महागौरी, कामाक्षी, मोहिनी, महिषासूरमर्दिनी अशा वेगवेगळ्या रुपातील पूजा याची देही याची डोळा अनुभवता येणार
कोल्हापूर : विश्वाची उत्पत्ती, दुष्टांचा संहार करून भक्तांना अभय देणाऱ्या आदिशक्तीचा जागर करणारा नवरात्रौत्सव उद्या रविवारपासून सुरू होत आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठातील प्रमुख देवता असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराची तयारी पूर्ण झाली असून सकाळी साडे आठ वाजता तोफेच्या सलामीने घटस्थापना होईल. नवरात्रौत्सवात भाविकांना अंबाबाईची महागौरी, कामाक्षी, मोहिनी, महिषासूरमर्दिनी अशा वेगवेगळ्या रुपातील पूजा याची देही याची डोळा ्अनुभवता येणार आ्हे. उत्सवाच्या पूर्वसंध्येलाच मंदिर अंबा माता की जयच्या गजराने दुमदुमून गेले आहे.
अंबाबाईचा नवरात्रौत्सव देशभरात प्रसिद्ध असून याकाळात २५ लाखावर भाविकांची नोंद होते. घटस्थापनेला देवीची पारंपारिक बैठी पूजा बांधली जाते. सकाळी साडे अकराच्या शासकीय पूजेनंतर दुपारची आरती होईल त्यानंतर दुपारी ३ वाजता सालंकृत पूजा बांधण्यात येईल. उत्सवाच्या पूर्वसंध्येलाच अंबाबाई मंदिर अंबा माता की जय च्या गजराने दुमदुमून गेले आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तरुण मंडळे देवीची ज्योत नेण्यासाठी मंदिरात दाखल झाले आहेत. ज्योत लावल्यानंतर देवीच्या नावाचा गजर करून ते आपआपल्या गावाला मार्गस्थ होत आहेत
गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेली पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीची तयारी पूर्ण झाली असून समितीच्या कार्यालयासमोर सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी भव्य व सुंदर मांडव उभारण्यात आला आहे. तेथे मंदिर परिसराला करण्यात येणाऱ्या फुलांची रचना केली जात आहे.
माहिती केंद्राचे उदघाटन
पागा इमारतीत सुरु करण्यात आलेल्या कायमस्वरुपी पर्यटन व माहिती केंद्राचे उदघाटन आज रविवारी सायंकाळी शाहू छत्रपती व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार आहे.
मोठा पोलीस बंदोबस्त
यंदा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाविकांची संख्या वाढणार हे गृहीत धरून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून शनिवारी सायंकाळी बंदोबस्ताचे वाटप करण्यात आले. दक्षिण दरवाजाबाहेरील परिसरात पोलीस कंट्रोल रुम उभारण्यात आले आहे