‘अंबाबाई’च्या दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 01:39 PM2019-11-04T13:39:24+5:302019-11-04T13:41:15+5:30
दीपावलीनिमित्त गेल्या पाच दिवसांपासून मिळालेल्या सुट्ट्यांमुळे कोल्हापूरच्या करवीरनिवासीनी अंबाबाई देवीचे लाखो भाविकांनी दर्शन घेतले. रविवारी तर भाविकांची मांदियाळीच फुलली होती.
कोल्हापूर : दीपावलीनिमित्त गेल्या पाच दिवसांपासून मिळालेल्या सुट्ट्यांमुळे कोल्हापूरच्या करवीरनिवासीनी अंबाबाई देवीचे लाखो भाविकांनी दर्शन घेतले. रविवारी तर भाविकांची मांदियाळीच फुलली होती.
दीपावलीनिमित्त गेल्या आठवडाभरापासून राज्यातील शाळांना सुट्टी लागली आहे. त्यात सरकारी कार्यालयेही मागील रविवारपासून सलग चार दिवस बंद होती. त्यामुळे करवीरनिवासीनी अंबाबाई देवीच्या दर्शनासह पन्हाळगड, जोतिबा, न्यू पॅलेस, नृसिंहवाडी, आदी ठिकाणी पर्यटक, भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
गेल्या पाच दिवसांपासून भवानी मंडप, भाऊसिंगजी रोड, महाद्वार रोड, ताराबाई रोड, जोतिबा रोड, शिवाजी चौक, आदी परिसरात खाद्यपदार्थांसह विविध वस्तूंच्या खरेदीसाठी पर्यटकांचे जथ्थेच्या जथ्थे फिरताना दिसत होते. वाहतूक व्यवस्थेसाठी शहर वाहतूक शाखेनेही गृहरक्षक दलाच्या जवानांसह विशेष व्यवस्था केली होती.
याकरिता बिंदू चौक, शिवाजी स्टेडियम परिसर, सरस्वती टॉकीज, मेनराजाराम हायस्कूल, आदी ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. बिंदू चौक येथे वाहने बाहेर काढताना वाहतुकीच्या कोंडीचे चित्र होते. मात्र, वाहतूक शाखेच्या पोलिसांनी कंबर कसल्याने ही कोंडी काही मिनिटांतच दूर होत होती.
विशेषत: शनिवारी व रविवारी पहाटे चार वाजल्यापासून सरलष्कर भवन मार्गाद्वारे एक लाख ३० हजार भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. काही भक्तांनी रांगांना असलेली तुडुंब गर्दी पाहता मुखदर्शनाचा लाभ घेतला. अंबाबाईप्रमाणेच वाडी रत्नागिरी येथे जोतिबा डोंगरावर ज्योतिर्लिंग व नृसिंहवाडी येथे नृसिंह सरस्वती दत्त यांच्या दर्शनासाठीही मोठी गर्दी होती.
यात्री निवास, धर्मशाळा, हॉटेल्स हाऊसफुल्ल
राज्यासह परराज्यांतील पर्यटकांच्या मोठ्या संख्येमुळे अंबाबाई परिसरातील यात्री निवास, धर्मशाळा, हॉटेल्स हाऊसफुल्ल झाली होती. यासोबतच खाद्यपदार्थांच्या गाड्यांसह हॉटेल्स, रेस्टॉरंट गर्दीने फुलली होती. त्यामुळे हॉटेलच्या बाहेर जेवणासाठी प्रतीक्षा करावी लागल्याचे चित्र होते.