आदमापूर येथे बाळूमामांच्या आमावस्या यात्रेला भाविकांची दर्शनासाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2023 09:43 PM2023-07-17T21:43:00+5:302023-07-17T21:44:35+5:30
दोन दिवसात तीन लाखांहून अधिक भाविक
बाजीराव जठार, लोकमत न्यूज नेटवर्क वाघापूर: महाराष्ट्र ,कर्नाटक ,गोवा, आंध्र प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश आदी राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्र आदमापूर (ता.भुदरगड)येथे आज सोमवती आमावस्येला दोन दिवसात तीन लाखांहून अधिक भाविकांनी बाळूमामांचे दर्शन घेतले. आदमापूर हे ठिकाण बाळूमामांच्या मुळे नावारूपाला आले असून महाराष्ट्र तसेच कर्नाटकातून १८ बग्ग्यातून (कळपातून) फिरत असणारी बाळूमामांची बकरी आदमापूर येथे बाळूमामाच्या भक्तांची गर्दी होण्यास कारणीभूत ठरत आहेत. जशी बकरी पुढे फिरत जातात तसे बाळूमामांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होताना दिसत आहे.
भाविकांना सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बाळूमामा देवालय समितीचे प्रशासकीय अध्यक्ष शिवराज नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली
अन्नछत्र, दर्शन लाईन अशा सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या. आंबील प्रसाद तसेच भाविकांना अन्नछत्र प्रसादासाठी सहा टन तांदूळ वापरण्यात आला.
भक्तांच्या वाहनांची पार्किंग व्यवस्थाही केली होती. त्यामुळे वाहन पार्किंगचा प्रश्न हे थोड्या प्रमाणात मार्गी लागला आहे. बाळूमामा देवालयाचे प्रशासकीय अधिकारी तसेच देवालयाचे कर्मचारी, पोलीस यंत्रणा, भाविकांनी अथक परिश्रम घेतले.परंतु आदमापूर ते मुदाळतिट्टा तसेच आदमापूर ते वाघापूर पाटीपर्यंत दिवसभरात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.
सध्या बाळूमामा यांच्या दर्शनाची सोय व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अनेक ठिकाणाहून लांब पल्ल्याच्या गाड्या आदमापूर येथे मुक्कामी सोडल्या आहेत. त्यामुळे भाविकांची प्रवासाची सोय चांगली झाली.