Kolhapur: दत्तजयंती सोहळ्यासाठी कर्नाटक, गोवा, गुजरातमधून भाविक नृसिंहवाडीत दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 14:28 IST2024-12-13T14:24:56+5:302024-12-13T14:28:41+5:30

प्रशांत कोडणीकर नृसिंहवाडी : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्तजयंती सोहळ्याची तयारी पूर्ण झाली. उद्या, शनिवारी (दि.१४) सायंकाळी ५ वाजता ...

Devotees from Karnataka, Goa, Gujarat arrive at Nrisimhwadi for Datta Jayanti celebrations | Kolhapur: दत्तजयंती सोहळ्यासाठी कर्नाटक, गोवा, गुजरातमधून भाविक नृसिंहवाडीत दाखल

Kolhapur: दत्तजयंती सोहळ्यासाठी कर्नाटक, गोवा, गुजरातमधून भाविक नृसिंहवाडीत दाखल

प्रशांत कोडणीकर

नृसिंहवाडी : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्तजयंती सोहळ्याची तयारी पूर्ण झाली. उद्या, शनिवारी (दि.१४) सायंकाळी ५ वाजता मुख्य मंदिरात दत्तजन्मकाळ सोहळा संपन्न होणार आहे. दत्त देवसंस्थान व ग्रामपंचायत मार्फत सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. दत्त दर्शनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, गुजरात आदी राज्यातून हजारो भाविक नृसिंहवाडीत दाखल झाले आहेत. भाविकांना दर्शनाची सोय व्हावी यासाठी अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

उद्या, शनिवारी दत्त मंदिरात पहाटे ४ वाजता काकड आरती व शोडषोपचार पूजा, सकाळी ७ ते १२ यावेळेत पंचामृत अभिषेक, दुपारी १२.३० वाजता श्रींचे चरणकमलावर महापूजा व भाविकांसाठी महाप्रसाद, दुपारी ३ वाजता येथील ब्रह्मवृंदांकडून पवमान पंचसुक्तांचे पठण होईल. 

दुपारी ४ नंतर श्री नारायणस्वामी महाराजांचे मंदिरातील श्रींची उत्सवमूर्ती सवाद्य मुख्य मंदिरात आणण्यात येईल त्यानंतर ४.३० वाजता ह,भ.प.भालचंद्र देव (रा.केज आंबेजोगाई) यांचे सुश्राव्य कीर्तन होऊन सायंकाळी ठीक ५ वाजता दत्त जन्मकाळ सोहळा संपन्न होणार आहे. जन्माकाळानंतर पारंपारिक आरती, पाळणा होऊन सुंठवडा प्रसाद वाटणेत येणार आहे. रात्री ९ नंतर धूप दीप आरती व पालखी सोहळा होवून रात्रो उशिरा शेजारती होणार आहे. श्रींचा पाळणा जन्मकाळानंतर उत्सवाचे मानकरी बाळकृष्ण राजोपाध्ये  यांचे सुयोग हॉल येथे भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

जादा एसटी बसेससह, पोलिसांचा चोख बंदोबस्त

भाविकांना दत्त दर्शन सुलभ व्हावे यासाठी दर्शनरांग व्यवस्था, मुखदर्शन, क्लोज सर्किट टीव्ही व्यवस्था, ध्वनीक्षेपक यंत्रणा, सकाळी १० ते रात्री १० पर्येंत मोफत महाप्रसाद, कापडी मंडप, शामियाना, आकर्षक विद्युत रोषणाई, आदी आवश्यक सोयी व सुविधा दत्त देव संस्थान मार्फत करण्यात आली. जादा एसटी बसेससह पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच पार्किंगची नेमकी व्यवस्था, फेरीवाले नियोजन, आरोग्य केंद्र, स्वच्छता, दिवाबत्ती आदी आवश्यक नियोजन करण्यात आल्याची माहिती सरपंच चित्रा सुतार व उपसरपंच रमेश मोरे यांनी दिली.

Web Title: Devotees from Karnataka, Goa, Gujarat arrive at Nrisimhwadi for Datta Jayanti celebrations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.