गणपतीपुळेत भक्त,पर्यटकांच्या संख्येत वाढ
By admin | Published: January 7, 2015 10:17 PM2015-01-07T22:17:04+5:302015-01-07T23:58:33+5:30
सुविधांची मागणी : भक्तगणांसाठी खास दर्शन रांगेची व्यवस्था
गणपतीपुळे : श्रीक्षेत्र गणपतीपुळे हे जागतिक पर्यटन व धार्मिक स्थळ म्हणून ओळखले जात असून, येणाऱ्या देश - विदेशातील पर्यटकांमध्ये वाढ झाली आहे. पर्यटकांना येथे विविध सेवा सुविधा मिळाव्यात, यासाठी स्थानिक पातळीवर विविध उपाययोजना करण्यात येतात. त्यामुळे भक्त पर्यटकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
भक्तांच्या संख्येत वाढ होत असताना देवस्थानमार्फत विविध उपक्रम नियोजनपूर्ण राबवत असून, त्याचा लाभ भक्तांना मिळत आहे. तसेच समुद्र चौपाटीवर नारळपाणी, भेळपुरी, थंडपेये आदी ठेवण्यात येत आहे.
गणपतीपुळेत प्राचीन कोकण हे एक अनोखे म्युझियम असून, यामध्ये बारा बलुतेदार व त्यांचे राहणीमान दाखवण्यात आले आहे. तसेच हस्तकला प्रदर्शन, शंख प्रदर्शन, उंचावरुन पाहण्यासाठी मचाण बांधण्यात आले आहे. हे म्युझियम पाहण्यासाठी सुमारे दीड तास लागतो.
गणपतीपुळेपासून सुमारे ३ किमी अंतरावर असणारी गायवाडी समुद्रचौपाटी सुंदर, रमणीय परिसर व वातावरण या ठिकाणी पॅरासिलिंग तसेच भूषण मेहेंदळे व विद्याधर पुसाळकर यांनी वॉटर स्पोर्टस् चालू केले असून, त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
या विविध सेवा सुविधा, स्पोर्टस, राहण्या-जेवणाची स्वस्त व्यवस्था, प्रेक्षणीय स्थळात होणारी वाढ, मंदिरे यामुळे गणपतीपुळेत भक्त पर्यटकांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे.
भक्तांना व्यवस्थित दर्शन व्हावे, यासाठी दर्शन रांगेची व्यवस्था, महिला दर्शन रांगेमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अन्नदान वाटपामध्ये १२ ते २ या वेळात खिचडीप्रसाद व सायंकाळी ७ ते ८ या वेळेत पुलाव प्रसाद म्हणून वाटप करण्यात येतो. पूजा अभिषेकाची व्यवस्था, सुरक्षिततेसाठी मेटल डिटेक्टर, मंदिर परिसरात सुरक्षारक्षक, कॉडलेस माईक सिस्टीम तसेच समुद्रावरील अपघात नियंत्रणासाठी सुरक्षारक्षक ठेवण्यात आले आहेत. तसेच देवस्थाचे सुमारे २०० खोल्यांचे भक्त निवाचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच भक्त निवास भक्तांच्या सेवेसाठी सज्ज होणार आहे.
गणपतीपुळे येथे आलेल्या देश -विदेशातील भक्त पर्यटकांना येथे पर्यटनाबरोबरच विविध सेवा सुविधा देण्यात येत असून, स्थानिक ग्रामस्थांमार्फत समुद्रामध्ये बोटिंगचा आनंद तसेच उंट, घोडा सवारी, समुद्रावरील रेल्वे, गाडी सवारी, समुद्रावर बाईक सवारी, फोटोंची सुविधा तसेच सनबाथसाठी गणपतीपुळेत प्रथमच दिलीप भुते या युवकाने लाँजरची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. (वार्ताहर)
देवस्थान भक्तांच्या सेवा सुविधांसाठी सज्ज.
दर्शन रांगेची व्यवस्था.
सुरक्षिततेसाठी मेटल डिटेक्टर व विशेष यंत्रणा.
व्यावसायिकांमार्फत विविध सेवा सुविधा.
गणपतीपुळे परिसरातील भंडारपुळे, नेवरे, मालगुंड, वरवडे, उंडी, रीळ, केसपुरी, भगवतीनगर आदी समुद्रकिनाऱ्यांवरील गावे व पर्यटनस्थळांचा होणार विकास.