भाविकांनी घेतला कार्तिक दर्शनाचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 01:24 PM2019-11-14T13:24:32+5:302019-11-14T13:25:57+5:30
कोल्हापुरातील भाविकांनी बुधवारी कार्तिक दर्शनाचा लाभ घेतला. वर्षातून एकदा येणाऱ्या या योगावर जोतिबा रोडवरील कार्तिक स्वामी मंदिराबाहेर दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.
कोल्हापूर : कोल्हापुरातील भाविकांनी बुधवारी कार्तिक दर्शनाचा लाभ घेतला. वर्षातून एकदा येणाऱ्या या योगावर जोतिबा रोडवरील कार्तिक स्वामी मंदिराबाहेर दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.
दरवर्षी तुळशी विवाहानंतर कार्तिक स्वामी दर्शनाचा योग येतो. यादिवशी ‘श्रीं’चे दर्शन घेतल्याने आयुष्यातील अडचणी दूर होतात, अशी श्रद्धा आहे. या योगावर देवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची झुंबड उडते. कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराच्या घाटी दरवाजाबाहेर कार्तिक स्वामींचे मंदिर आहे.
बुधवारी पहाटे पाच वाजता ‘श्रीं’च्या मूर्तीस अभिषेक करण्यात आला. त्यानंतर अलंकारिक पूजा बांधून भाविकांसाठी दर्शन खुले करण्यात आले. पुजारी शांतिनाथ कदम यांनी पूजा बांधली. मंगळवारी त्रिपुरारी पौर्णिमा असल्याने त्या दिवसापासूनच कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी भाविक येत होते.
बुधवारी सकाळी सहा ते रात्री आठ या वेळेत दर्शनाचा योग होता. त्यामुळे सहा वाजल्यापासूनच मंदिराबाहेर भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. उन्हामुळे सकाळी अकरानंतर गर्दी कमी झाली. दुपारी चारनंतर पुन्हा गर्दीचा ओघ वाढला. सायंकाळी सहा वाजता या रांगा घाटी दरवाजापर्यंत गेल्या होत्या. मंदिराच्यावतीने भाविकांना प्रसादाचे वाटप केले जात होते. या खास दिवसानिमित्त मंदिराला फुला-पानांची तसेच आकर्षक विद्युत रोषणाईही करण्यात आली होती.
मोरपीस आणि गैरसमज
दरवर्षी कार्तिक दर्शनाच्या दिवशी परिसरात मोठ्या प्रमाणात मोरपिसांची विक्री केली जाते. बुधवारीदेखील हेच चित्र होते. मोर हे कार्तिक स्वामींचे वाहन आहे. भाविक हे मोरपीस विकत घेऊन कार्तिक स्वामींना वाहतात. मात्र, मोरपीस वाहण्याला कोणताही धार्मिक आधार नाही. देवाला वाहण्यासाठी फूल एखादे फळ किंवा प्रसाद आणावा मोरपीस आणण्याची गरज नाही, अशी माहिती पुजारी शांतिनाथ कदम यांनी दिली. कार्तिक स्वामी ब्रह्मचारी आहे, महिलांनी दर्शन घेऊ नये हा सगळा गैरसमज आहे, असेही ते म्हणाले.