भरपावसात भाविकांनी घेतले अंबाबाईचे दर्शन; शेड उभारण्याची मागणी
By संदीप आडनाईक | Published: July 6, 2024 09:21 PM2024-07-06T21:21:12+5:302024-07-06T21:21:23+5:30
भरपावसातही शनिवारी असंख्य भाविकांनी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले.
कोल्हापूर: भरपावसातही शनिवारी असंख्य भाविकांनी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले. शनिवार आणि रविवारची सुटीला जोडून कोल्हापुरात पर्यटनासाठी आलेल्या हजारो भाविकांनी शनिवारी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. ही रांग मंदिराबाहेरपर्यंत लांबली होती. भाविकांसाठी उभारलेल्या दर्शनरांगेत शेडची व्यवस्था नसल्यामुळे अनेक महिला, ज्येष्ठ नागरिकांसह भाविकांना सायंकाळी पडलेल्या जोरदार पावसामुळे सुमारे तासभर भिजत रांगेतच थांबावे लागले.
करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक येतात. शनिवारीही हजारो भाविकांनी अंबाबाई मंदिरात हजेरी लावली. सायंकाळी तासभर पडलेल्या पावसामुळे रांगेत उभारलेल्या अनेक भाविकांना याचा फटका बसला. महिला, लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांची यामुळे तारांबळ उडाली. टोप्या, छत्री, साडीचे पदर डोक्यावर घेत महिलांना तसेच इतर भाविकांना भरपावसात दर्शन रांगेत थांबावे लागले. त्यामुळे दर्शनरांगेत शेड उभारण्याची गरज भाविकांनी बोलून दाखविली. या शेडमुळे भाविकांचे ऊन, वारा तसेच पावसापासून बचाव होणार आहे. अंबाबाईच्या भाविकांसाठी देवस्थान समितीने प्रथमोपचार केंद्र, पिण्याचे पाणी, शौचालयाची व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे, तसेच दर्शनरांगेत एलसीडीद्वारे अंबाबाईचे लाइव्ह दर्शनाची सुविधा पुरवलेली आहे. सोबत पोलिस बंदोबस्तही आहे.
वॉटरप्रूफ दर्शनरांगेची मागणी
पावसापासून भाविकांचे संरक्षण करण्यासाठी दर्शनरांगेत शेड नाही. पाऊस आलाच तर भाविकांना चिखल व पाण्याचा त्रास होऊ नये यासाठी शेडची व्यवस्था करण्याचीही मागणी भाविकांनी केली आहे. पावसातही देवीचे सुलभ दर्शन घेता यावे यासाठी दर्शनरांग वॉटरप्रूफ करावी, अशी भाविकांची आग्रही मागणी आहे. यामुळे भाविकांना २४ तास दर्शनरांगेत थांबता येणार आहे. जुना राजवाडा पोलिस ठाण्यापासून रामपारावरील लोखंडी शिडीपर्यंतच्या दर्शनरांगेच्या मार्गावर हे शेड उभारल्यास त्याचा फायदा भाविकांना होणार आहे.