जोतिबा डोंगरावर भाविकांना लुटले अन् पोलिसांची झोप उडाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 12:01 PM2021-03-26T12:01:16+5:302021-03-26T12:03:43+5:30
Crime News Kolhapur police- जोतिबा डोंगरावर देवदर्शनासाठी आलेल्या महिला भाविकांचे सोन्याचे दागिने भरदिवसा अप्पा माने व त्याच्या चार साथीदारांनी ऑक्टोबर २०१९ मध्ये लुटले. पाठोपाठ लुटीच्या तीन घटना घडल्या अन् पोलिसांची झोप उडाली.
कोल्हापूर : जोतिबा डोंगरावर देवदर्शनासाठी आलेल्या महिला भाविकांचे सोन्याचे दागिने भरदिवसा अप्पा माने व त्याच्या चार साथीदारांनी ऑक्टोबर २०१९ मध्ये लुटले. पाठोपाठ लुटीच्या तीन घटना घडल्या अन् पोलिसांची झोप उडाली.
टोळीने इतर ठिकाणीही दरोडा, वाटमारी, खंडणीचे गुन्हे केले. अखेर तब्बल अडीच वर्षांनी तो पुन्हा कोल्हापुरात परतला अन् जाळ्यात अडकला. शिवाजी विद्यापीठाच्या परिसरात दबा धरून बसलेल्या पोलिसांशी त्यांची झटापट झाली. पोलिसांच्या नियोजनात जरा जरी चूक झाली असती तर त्याने पोलिसावरच फायरिंग केले असते.
चांदेकरवाडी (ता. राधानगरी) येथील महिला भाविक नातेवाइकांसोबत दि. ५ ऑक्टोबर २०१९ रोजी दुपारी जोतिबा डोंगरावर देवदर्शनासाठी गेले. सिद्धोबा मंदिराकडे पायी जाताना आरोपी अप्पा माने, दादासाहेब कोडोलकर, सचिन बलभीम कारंडे, शहाजी बबन लोखंडे (सर्व रा. फलटण) यांनी त्यांना अडवून मारहाण केली व १३ तोळे सोन्याचे दागिने लुटले. तत्पूर्वी टोळीकडून दि. २० ऑगस्टला आणखी दोन भाविकांना लुटल्याच्या नोंदी कोडोली पोलिसांत आहेत. कोडोलकर अद्याप फरार आहे, तर कारंडे व लोखंडे हे पुणे कारागृहात आहेत.
... अन्यथा पोलिसांवर फायरिंग केले असते !
आरोपी अप्पा माने व पप्पू सोनवलकर यांनी बेळगाव परिसरात ज्वेलर्सवर दरोडा घालण्यासाठी रेकी केली, तसेच ते गडहिंग्लजमार्गे कोल्हापुरात आले. त्यांची माहिती गोपनीय बातमीदारामार्फत स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना मिळाली. आरोपींनी यापूर्वी गुन्ह्यात फायरिंग केल्याने सुरक्षेसाठी निरीक्षक सावंत यांनी तीन पथके स्थापन केली.
राखीव दलाचे पोलीस निरीक्षक सत्यवान माशाळकर यांनी शीघ्र कृती दलाच्या पथकासोबत शिवाजी विद्यापीठाच्या परिसरात दबा धरला. त्यावेळी विनानंबरच्या दुचाकीवरून संशयित अप्पा व पप्पू आले. त्यांना अडवले. पोलिसांचा संशय आल्याने आरोपींनी पळण्याचा प्रयत्न केला. स.पो.नि. सत्यराज घुले व उपनिरीक्षक विनायक सपाटे यांनी सहकाऱ्यांसह त्यांच्यावर झडप घातली.
दोघांनी त्यांच्या कमरेच्या पिस्टलवर ताबा मिळविला. अन्यथा आरोपींनी पोलिसांवरच फायरिंग केले असते. पोलीस व आरोपींत झटापट झाली. अखेर आरोपींच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडील दोन पिस्टलांसह २० जिवंत राऊंड, तीन मॅगजीन, मोबाईल, दुचाकी असे जप्त केले.
कारवाईमध्ये सहायक फौजदार महादेव कुराडे, अमोल कोळेकर, अर्जुन बंदरे, नितीन चोथे, अजय वाडेकर, कृष्णात पिंगळे, विलास किरोळकर, सचिन पाटील, अनिल पास्ते, नामदेव यादव, रणजित पाटील, संदीप कुंभार, सागर कांडगावे, तुकाराम राजिगरे, संतोष पाटील, महेश गवळी, राम कोळी, ओंकार परब, विठ्ठल मणिकरी, वैभव पाटील, तसेच मुख्यालयाकडील शीघ्र कृती दलाच्या पथकांचा सहभाग होता.