‘दिवाळे’तील पूर्ण रक्कम वसूल करणार

By admin | Published: April 27, 2017 01:05 AM2017-04-27T01:05:41+5:302017-04-27T01:05:41+5:30

यंत्रमागधारकांच्या सयुंक्त बैठकीत निर्णय : ‘तलेसरा’ प्रकरणाच्या गुप्तचर चौकशीची मागणी करणार

'Dewale' will recover the full amount | ‘दिवाळे’तील पूर्ण रक्कम वसूल करणार

‘दिवाळे’तील पूर्ण रक्कम वसूल करणार

Next

इचलकरंजी : तलेसरा दिवाळे प्रकरणात अडकलेल्या कापड उत्पादक यंत्रमागधारकांना त्यांचे पूर्णपणे पेमेंट मिळण्यासाठी बालोत्रा येथे जाऊन सर्व पातळींवर प्रयत्न करण्याबरोबरच न्यायालयीन मार्गाचा अवलंब करण्याचा निर्णय बुधवारी इचलकरंजी व विटा शहरातील यंत्रमागधारकांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. तसेच शासनाने गुप्तचर खात्यामार्फत चौकशी करण्याच्या मागणीसह पेमेंटसाठी तडजोड न स्वीकारता दिवाळखोरीची प्रवृत्ती मोडून काढण्याचे यावेळी ठरविण्यात आले.
सरासरी सव्वा कोटी रुपयांच्या व्यवहाराची उलाढाल करणाऱ्या गौतमकुमारजी तलेसरा यांचे दोन महिन्यांपूर्वी निधन झाले. त्यानंतर मात्र त्यांच्या मुलांना त्यांच्या वडिलांसारखा धंदा करणे जमले नाही, अशी चर्चा येथील कापड बाजारात आहे. परिणामी, कापडाच्या पेमेंटपोटी दिलेले धनादेश परत येऊ लागल्यामुळे पॉपलीन उत्पादक यंत्रमागधारकांमध्ये खळबळ उडाली. तसेच तलेसरा बंधू हे इचलकरंजीतून निघून जाऊन बालोत्रा येथे असल्याचे समजताच अनेक यंत्रमागधारकांनी बालोत्रा गाठले.
बालोत्रा येथे गेलेले सुमारे ७० यंत्रमागधारक आठवडाभर तेथे ठिय्या मारून बसले आहेत. विटा व इचलकरंजीतील यंत्रमागधारकांच्या कापडाचे सुमारे ३५ कोटी रुपयांचे पेमेंट अडकले असताना प्रत्यक्षात मात्र दहा ते बारा कोटी रुपयांचाच ताळमेळ लागत आहे. मात्र, या प्रकरणात तलेसरा बंधू समोर येत नसल्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. त्यांच्या व्यवहारात मध्यस्थी करणाऱ्या नातेवाइकांकडून काही प्रमुख यंत्रमागधारकांच्या पुढाऱ्यांसमोर तलेसरा बंधूंना हजर करू, असे सांगण्यात आल्यामुळे त्याठिकाणी कैस बागवान, राजेंद्र राशिनकर, तुकाराम साळुंखे, आदी यंत्रमागधारक वगळता अन्य सर्व इचलकरंजीला परत येण्यासाठी बुधवारी निघाले आहेत.
तलेसरा बंधूंशी वाटाघाटी करून आणि येण्या-देण्याविषयी प्रत्यक्ष रुजवात घालण्यासाठी बुधवारी इचलकरंजीतून श्रीशैल कित्तुरे, जयवंत आचलकर, अशोक गटे, सुरेश मुसळे व विटा येथील वैभव चोथे बालोत्रा येथे रवाना झाले. दरम्यान, या व्यवहारात निर्णायक बोलणी करण्यासाठी इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी, सागर चाळके, सचिन हुक्किरे, विटा येथील किरण तारळेकर शनिवारी बालोत्रा येथे जाणार आहेत. दरम्यान, येथील पॉवरलूम असोसिएशनच्या सभागृहात इचलकरंजी व विटा येथील पॉपलीन कापड उत्पादक यंत्रमागधारकांची बैठक झाली. या बैठकीत यंत्रमागधारकांचे अडकलेले शंभर टक्के पेमेंट वसूल करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याबरोबरच न्यायालयीन लढाई लढण्याचाही निर्णय घेण्यात आला. (प्रतिनिधी)


रक्कम हडपण्याचा डाव उधळणार
तलेसरा प्रकरणात इचलकरंजी व विटा येथील यंत्रमागधारकांचे एकूण सुमारे ३५ कोटी रुपयांचे पेमेंट अडकले आहे. त्याबाबत बालोत्रा येथे जाऊन तेथील व्यापाऱ्यांबरोबर रुजवात घातली असता दहा ते बारा कोटी रुपयांचा ताळमेळ लागत आहे. या प्रकरणात ३० ते ३५ टक्के रक्कम यंत्रमागधारकांना देऊन बाकीची रक्कम हडप करण्याचा डाव असल्याचे येथील यंत्रमागधारकांच्या नेत्यांच्या लक्षात आले आहे. म्हणून या प्रकरणातील शंभर टक्के पेमेंट वसूल करावे. जेणेकरून पुन्हा दिवाळे काढण्याचे कोणी धाडस करणार नाही, असा निर्धार बुधवारच्या येथील बैठकीत अनेकांनी बोलून दाखविला.
 

Web Title: 'Dewale' will recover the full amount

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.