Kolhapur: जोतिबा चैत्र यात्रेत धैर्यशील मानेंनी नाचवली सासनकाठी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 04:43 PM2024-04-23T16:43:08+5:302024-04-23T16:54:02+5:30
गुलाल, खोबऱ्यांची उधळण, सासनकाठ्या नाचवत लाखो भाविक जोतिबाच्या नावानं चांगभलं..च्या गजरात तल्लीन
दुर्वा दळवी
कोल्हापूर: महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रमधील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान, वाडी रत्नागिरी (ता. पन्हाळा) येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची आज, मंगळवारी चैत्र यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. गुलाल, खोबऱ्यांची उधळण, सासनकाठ्या नाचवत लाखो भाविक जोतिबाच्या नावानं चांगभलं..च्या गजरात तल्लीन झाले आहेत.
दरम्यानच, हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनीही प्रचाराच्या धामधुमीतून वेळ काढत श्री जोतिबाचे दर्शन घेतले. तसेच खांद्यावर घेवून सासनकाठीही नाचवली. तर जनतेच्या सुखासाठी जोतिबा चरणी प्रार्थना केली.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना धैर्यशील माने म्हणाले, हा परमेश्वराचा गुलाल आहे. माझ्या हातातून चांगली कामे घडत राहावीत, लोकांची सेवा घडत राहावी अशी प्रार्थना केली. तसेच माझ्या वाढदिवसादिवशी जेव्हा मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटलो त्यावेळी मोदींना दख्खनचा राजा श्री जोतिबाची मुर्ती भेट दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. माझे भक्ती अन् श्रद्धास्थान असल्याने मी जोतिबा चरणी आल्याचे सांगत देवाकडे काय मागावे तो सर्वांच्या मनातील जानतो त्यामुळे केवळ जोतिबा चरणी नतमस्तक व्हावे या भावनेने आपण आल्याचे ते म्हणाले. राजकारण हे देवळाच्या बाहेर. देवाच्या चरणी सर्वजण सारखे असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जुन सांगितले.
नरेंद्र मोदी हे निश्चितच पुन्हा एकदा पंतप्रधान आहेत याबाबत मनामध्ये तिळमात्र शंका नसल्याचा विश्वासही माने यांनी व्यक्त केला. तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून कोल्हापूरच्या विकासासाठी भरघोस निधी मिळावा अशी अपेक्षाही व्यक्त केली.
यात्रेनिमित्त गेल्या चार दिवसांपासूनच मानाच्या सासनकाठया जोतिबा डोंगरावर दाखल झाल्या. चांगभलंच्या गजराने डोंगर दुमदुमून गेला आहे. डोंगर वाटा भाविकांच्या गर्दीने फुलून गेल्या आहेत. भाविक बैलगाडी, खाजगी वाहनातून, तसेच पायीदेखील जोतिबा डोंगरावर दाखल झाले आहेत. यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने चोख नियोजन केले आहे.