‘धामणी’चे नेतृत्व एन. डी. पाटील यांनी स्वीकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 12:07 PM2019-05-08T12:07:01+5:302019-05-08T12:16:58+5:30

राई (ता. राधानगरी ) येथील धामणी प्रकल्पाच्या प्रलंबित कामाला गती देण्यासाठी ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी लढ्याचे नेतृत्व स्वीकारले. येत्या आठ दिवसांत धामणी परिसरातील शेतकऱ्यांची बैठक घेऊन लढ्याचे रणशिंग फुंकण्याचा निर्णय मंगळवारच्या प्राथमिक बैठकीत घेण्यात आला.

'Dhamani' lead N. D. Patil accepted | ‘धामणी’चे नेतृत्व एन. डी. पाटील यांनी स्वीकारले

धामणी प्रकल्पाबाबत ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्या कोल्हापुरातील रुईकर कॉलनी येथील निवासस्थानी बैठक झाली. यामध्ये विक्रांत पाटील, आर. एस. पाटील, बाबासाहेब पाटील-भुयेकर, राजेंद्र सूर्यवंशी, दिनकर पाटील, आदी उपस्थित होते.(छाया- नसीर अत्तार)

Next
ठळक मुद्देआठ दिवसांत शेतकऱ्यांच्या बैठकीत लढ्याची दिशाराजकारणविरहित एकत्र येण्याचे आवाहन

कोल्हापूर : राई (ता. राधानगरी ) येथील धामणी प्रकल्पाच्या प्रलंबित कामाला गती देण्यासाठी ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी लढ्याचे नेतृत्व स्वीकारले. येत्या आठ दिवसांत धामणी परिसरातील शेतकऱ्यांची बैठक घेऊन लढ्याचे रणशिंग फुंकण्याचा निर्णय मंगळवारच्या प्राथमिक बैठकीत घेण्यात आला.

‘धामणी’ प्रकल्प गेले अनेक वर्षे प्रलंबित राहिला आहे. सध्या धरणाचे ७५ टक्के काम झाले असून, पुढील कामाला गती लागत नसल्याने परिसरातील २५ गावांनी लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकून सरकारचा निषेध केला. आता नव्याने लढा उभा करावा व त्याचे नेतृत्व एन. डी. पाटील यांनी करावे, यासाठी मंगळवारी परिसरातील शेतकºयांनी त्यांची भेट घेतली.

यावेळी प्रा. पाटील यांनी पाटबंधारे प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन चर्चा केली. ‘धामणी’ प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील यांनी प्रकल्पाची वस्तुस्थिती मांडली. प्रकल्पास १९९७ ला मंजुरी मिळाली. त्यानंतर काम चालू-बंद असेच राहिले. संबंधित ठेकेदाराने ७५ टक्के काम पूर्ण केले. घळभरणीसह किरकोळ कामे राहिली आहेत. निधी उपलब्ध झाला असता तर २०१४ मध्ये धरणाचे काम पूर्ण झाले असते.

ठेकेदाराचे बिल न मिळाल्याने काम रेंगाळत गेले. त्यात २०१६ ला राज्य सरकारने उर्वरित काम सरकारच्या यांत्रिकीकरण विभागाकडून करून घेण्याची अट घातली. हा विभाग सक्षम नसेल तर फेरनिविदा काढण्याचे आदेश दिल्याने ठेकदाराने न्यायालयात धाव घेतली. आचारसंहिता लागण्यापूर्वी पाटबंधारे विभागाने निविदा जाहीर केली; पण न्यायालयाने निविदा प्रक्रियेस अंतरिम स्थगिती दिल्याने पेच निर्माण झाला आहे.

ठेकेदाराची २०१० पर्यंत ५६ कोटी देय रक्कम होती. त्यानंतर २०११ व २०१२ मध्ये त्यांनी कामे केली. त्याचबरोबर माल व साहित्य मोठ्या प्रमाणात असल्याने त्याची जबाबदारी विभागाने घ्यावी, असे ठेकेदाराचे म्हणणे आहे. सर्व मिळून १०९ कोटी अंतिम बिल झाले आहे; पण त्यांनी २७७ कोटींचा दावा केला आहे. पाटबंधारे विभागाने न्यायालयात आपली बाजू मांडली आहे. बिल दिल्यानंतर स्थगिती मागे घेण्याची ठेकेदाराची तयारी असल्याचे सांगितले.

पाण्याच्या प्रतीक्षेत २० वर्षे गेली. आता आमचा संयम संपला. जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी २०१७ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याची ग्वाही दिली, त्याचे काहीच झाले नाही. आपण या लढ्याचे नेतृत्व करावे, अशी विनंती दिनकर पाटील (वेतवडे) यांनी केली. यावर, पण सगळे शेतकरी ठाम राहिले पाहिजेत. राजकारणविरहीहित लढा उभारणार असाल तर प्रा. पाटील त्याचे नेतृत्व करतील.

इचलकरंजी पाणीप्रश्नी शिरोळचे शेतकरी एकसंध राहिल्यानेच लढ्यास यश आल्याचे विक्रांत पाटील यांनी सांगितले. प्रा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली सगळे शेतकरी राजकारण बाजूला ठेवून उभे राहतील, असा विश्वास करवीरचे सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांनी व्यक्त केला. आठ दिवसांत शेतकऱ्यांची बैठक घेऊन प्रा. पाटील आंदोलनाची दिशा ठरवतील, असा निर्णय घेण्यात आला. शेतकरी संघाचे उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील-भुयेकर, प्रमोद पाटील, श्रीपती पाटील (गोगवे), धैर्यशील पाटील (आकुर्डे), आदी उपस्थित होते.

जुन्या ठेकेदारासाठी दोन आमदारांचा आग्रह

जुन्या ठेकेदाराने ७५ टक्के काम पूर्ण केल्याने त्यांनाच कायम ठेवण्यासाठी आमदार प्रकाश आबिटकर व आमदार चंद्रदीप नरके आग्रही होते; पण त्याच ठेकेदारासाठी तुमचा हेतू काय? अशी विचारणा काही मंडळींनी केल्याने थोडे अडल्याचे दिनकर पाटील यांनी सांगितले.

अजून दोन वर्षे प्रतीक्षा

धरणक्षेत्रात तीन गावे बाधित असून त्यांना २२ हेक्टर जमीन वाटप केली. उर्वरित जमीनवाटपाबाबत इतर शेतकऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन करीत, पावसाळ्यात टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये काम सुरू झाले तरी तेथून काम पूर्ण होण्यास दोन वर्षे लागतील, असे एस. आर. पाटील यांनी सांगितले.

 

Web Title: 'Dhamani' lead N. D. Patil accepted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.