धामणी नदीचे पात्र कोरडे
By admin | Published: April 24, 2017 12:00 AM2017-04-24T00:00:54+5:302017-04-24T00:00:54+5:30
तीव्र पाणीटंचाई : धामणी प्रकल्पाचा प्रश्न ऐरणीवर
महेश आठल्ये ल्ल म्हासुर्ली
मातीच्या बंधाऱ्यात अडविलेले पाणी संपल्याने धामणी नदीचे पात्र कोरडे पडले असून, धामणी खोऱ्यातील २० ते २५ गावांत तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. नदीत जेसीबीद्वारे खड्डे खोदून पाणी मिळविण्यासाठी शेतकऱ्यांत जणू स्पर्धा लागली असून, या पाण्यावरून मोठ्या वादाचे प्रसंग उद्भवू लागले आहेत. खोऱ्यातील तीव्र पाणीटंचाईमुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पिके करपत असून, शेतकरी वळवाच्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. यामुळे धामणी प्रकल्पाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रकल्पाचे काम या महिन्यात सुरू करण्याचे मुंबई येथील बैठकीत गत महिन्यात दिलेले आश्वासन निव्वळ आश्वासनच राहणार का? असा प्रश्न शेतकऱ्यांतून उपस्थित होत आहे.
धामणी खोऱ्यात पावसाळ्यात मुबलक पाऊस पडतो. मात्र, साठवण प्रकल्प नसल्याने सर्व पाणी वाहून जाते. परिणामी, धामणी खोऱ्यात जानेवारीपासूनच पाणीटंचाई जाणवते. यासाठी शेतकरी स्वखर्चाने व श्रमदानाने धामणी नदीवर मातीचे बंधारे घालून पाणी अडवून ते काटेकोर नियोजनाने पुरवून वापरतो व आपली पिके वाढवतो. मात्र, हे पाणी मार्च-एप्रिलमध्येच संपून जाते. या खोऱ्यास सुमारे तीन महिने तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागतात. सध्या राही-कंदलगावपासून पणोरेवर सुमारे ४० च्या आसपास वाड्या-वस्त्या सध्या नदीपात्रातील मातीच्या बंधाऱ्यातील पाणी संपल्याने पाणीटंचाईच्या फेऱ्यात अडकल्या आहेत. सर्वच बंधारे कोरडे पडले असून, नदीपात्रात वाळवंट तयार झाल्याचे भासते. सध्या पाणी मिळविण्यासाठी शेतकरी नदीपात्रात जेसीबीद्वारे खड्डे खोदून पाणी मिळविण्यासाठी धडपडत असून, त्यातही त्यांना अपयश येत आहे.
सध्या या परिसरात शेतीसह जनावरे व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, नळपाणीपुरवठा योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. येत्या आठवड्याभरात नागरिकांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागणार असून, खोऱ्यातील बळिराजा हवालदिल झाला आहे.
या खोऱ्यास वरदान ठरणाऱ्या धामणी प्रकल्पाचे काम अद्यापही
सुरू न झाल्याने, तसेच झापावाडी व पणोरे येथील लघुपाटबंधारे प्रकल्पांची कामेही संथगतीने सुरू असल्याने येत्या दोन वर्षांतही या खोऱ्यातील पाणीटंचाई कमी होण्याबद्दल साशंकता व्यक्त होत आहे. सध्या खोऱ्यातील पिके
वाळू लागली असून, शेतकऱ्यांना आर्थिक संकटास सामोरे जावे लागणार असल्याने तो हवालदिल झाला आहे.