धामणी प्रकल्प पूर्ण करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2017 12:58 AM2017-02-19T00:58:11+5:302017-02-19T00:58:11+5:30
चंद्रकांतदादा पाटील : आसळज, तिसंगी येथे जाहीर सभा
गगनबावडा/ साळवण : गगनबावडा तालुक्यासाठी वरदान असलेला धामणी प्रकल्प जलदगतीने पूर्ण करू, अशी ग्वाही शनिवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी येथे दिली.
आसळज व तिसंगी येथे जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी भाजप-ताराराणी आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. प्रमुख उपस्थिती माजी आमदार महादेवराव महाडिक, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे उमेदवार पी. जी. शिंदे, एम. जी. पाटील, आनंदा पाटील, पंचशीला कांबळे, राणी खाडे, सतीश पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार पोवार, गगनबावडा तालुकाध्यक्ष संदीप पाटील, शशांक पारगावकर, विलास पाटील, तानाजी पाटील, तानाजी कांबळे, आदींची होती.
पाटील म्हणाले, केंद्रात व राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार असल्यामुळे जास्तीत जास्त निधी जिल्ह्यात येण्यासाठी पार्लमेंट ते पंचायत, असे भाजप सरकार येणे गरजेचे आहे. गगनबावडा तालुका वनसंपत्तीने समृद्ध आहे. रामलिंग देवस्थान, गगनगिरी देवस्थान, मोरजाई देवस्थान, इत्यादी देवस्थानांचा रखडलेला विकास, तसेच गगनबावडा तालुका पर्यटनाच्यादृष्टीने आघाडीवर नेण्यासाठी प्रयत्नशील राहू. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भ्रष्टाचारमुक्त व सामान्य नागरिकांना दिलासा देणारे सरकार चालवित आहेत. तरी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आपले मत भाजप व ताराराणी पक्षाच्या उमेदवारांना देऊन विकासाच्या भागीदारीमध्ये आपला सहभाग नोंदवावा.
माजी आमदार महाडिक म्हणाले, कोणत्याही दबावाला बळी न पडता गगनबावडा तालुक्यात परिवर्तनासाठी भाजप व ताराराणी पक्षाच्या उमेदवारांना विजयी करा.
पी. जी. शिंदे यांनी आमदार सतेज पाटील गटाच्या टीकेला विजयी मेळाव्यातच प्रत्युत्तर देईन, असे त्यांनी सांगितले. यावेळी भाजप-ताराराणी आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)
गगनबावडा तालुक्यात असळज व तिसंगी येथे जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी भाजप-ताराराणी आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवारी आयोजित जाहीर सभेत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पी. जी. शिंदे, एम. जी. पाटील, आनंदा पाटील, पंचशीला कांबळे, राणी खाडे, सतीश पाटील, नंदकुमार पोवार, संदीप पाटील, शशांक पारगावकर, मेघाराणी जाधव, आदी उपस्थित होते.