धनंजय गुंडे म्हणजे साक्षेपी योग संशोधक
By admin | Published: June 24, 2017 05:27 PM2017-06-24T17:27:33+5:302017-06-24T17:27:33+5:30
महापौर फरास यांचे गौरवोद्गार : महापालिकेतर्फे पुरस्कार प्रदान
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. २४ : आंतरराष्ट्रीय योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे डॉ. धनंजय गुंडे हे साक्षेपी योग संशोधक असून, ते कोल्हापुरात जन्मले, हे आपले आपले भाग्य आहे, असे गौरवोद्गार महापौर हसिना फरास यांनी शनिवारी येथे बोलताना काढले. कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनातर्फे डॉ. गुंडे यांना ‘योग जीवन गौरव पुरस्कार’ देऊन गौरविल्यानंतर महापौर बोलत होत्या.
येथील केशवराव भोसले नाट्यगृहात झालेल्या शानदार समारंभात महापौर फरास यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र देऊन डॉ. धनंजय गुंडे व ललिता गुंडे यांचा गौरव केला. यावेळी महानगरपालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, तसेच योगसाधक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वैद्यकीय व्यावसायिक असूनही डॉ. गुंडे यांनी, योग म्हणजे काय हे माहीत नसलेल्या काळात योगप्रसाराचे कार्य हाती घेतले आणि आरोग्यसंपन्न कोल्हापूर निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी केवळ कोल्हापूर जिल्ह्यातच नाही तर देशात आणि परदेशांतही जनसामान्यांना योगाचे धडे दिले. राष्ट्रपती, पंतप्रधान यांनाही योगाचे धडे देणारे डॉ. गुंडे खऱ्या अर्थाने योगपुरुष आहेत, असे महापौर म्हणाल्या.
डॉ. गुंडे यांनी आतापर्यंत ८९० शिबिरे घेतली. त्यांपैकी १५० शिबिरे ही परदेशात घेतली. अनुभवाइतका चांगला गुरू नाही, हे जाणलेल्या डॉ. गुंडे यांनी आयुष्यभर चांगले-वाईट अनुभव घेतले आणि त्यातूनच त्यांनी योगाचा प्रसार केला, असे प्राचार्य हेरवाडे म्हणाले; तर डॉ. गुंडे यांच्या रूपाने कोल्हापूरला एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व लाभल्याचे राजू शेटे यांनी सांगितले. तरुण पिढी निरोगी आणि आरोग्यदृष्ट्या सक्षम व्हावी, या तळमळीने गुंडे यांनी अव्याहतपणे कार्य केले, असे भाजप गटनेते विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.
यावेळी नगरसेवक आशिष ढवळे यांनी प्रास्ताविक केले, तर स्थायी समितीचे सभापती डॉ. संदीप नेजदार यांनी आभार मानले. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटकर, विरोधी पक्षनेता किरण शिराळे, गटनेते सत्यजित कदम उपस्थित होते.
...अन् गुंडे गहिवरले
महानगरपालिकेतर्फे ‘योग जीवन गौरव पुरस्कारा’ने गौरविण्यात आल्यानंतर बोलताना डॉ. धनंजय गुंडे यांना गहिवरून आले. माझ्या आयुष्यातील काही संस्मरणीय प्रसंग आठवणीत आहेत, त्यांमध्ये आजच्या सत्काराची भर पडली. हाही प्रसंग आयुष्यभर स्मरणात राहील. मी चौथी पास झालो त्यावेळी रडलो. त्यानंतर मला ज्या ज्या वेळी यश मिळत गेले, त्या त्या वेळी मी रडलो. जीवनात माझे यशच मला रडविते, असे सांगून डॉ. गुंडे म्हणाले की, मी सांगतो म्हणून तुम्ही अंधश्रद्धेपोटी करू नका. जे पटतं ते समजून घ्या आणि मनापासून करा. मला माझ्या गुरूंकडून स्फूर्ती मिळाली आणि मी शिष्य झालो. शिष्य तयार करता येत नाही. जो मनापासून काम करतो तोच शिष्य होतो, असे गुंडे म्हणाले.