धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली दिलगिरी: तुम्ही सांगाल तशी पुढील वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 10:25 AM2019-03-14T10:25:17+5:302019-03-14T10:30:18+5:30
कोल्हापूर : माझ्याबद्दल राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांत गैरसमज असल्याचे जाणवते. माझ्याकडून अनवधानाने काही गोष्टी झाल्याही असतील; पण मी त्या जाणीवपूर्वक ...
कोल्हापूर : माझ्याबद्दल राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांत गैरसमज असल्याचे जाणवते. माझ्याकडून अनवधानाने काही गोष्टी झाल्याही असतील; पण मी त्या जाणीवपूर्वक करीत नाही आणि तो माझा स्वभावही नाही. तरीही माझ्या हातून काही चुका झाल्या असतील तर या व्यासपीठावरून त्याबद्दल जाहीर दिलगिरी व्यक्त करतो. चुका पदरात घ्या आणि साथ द्या... असे भावनिक आवाहन करीत ‘येथून पुढे तुम्ही सांगाल त्याप्रमाणेच वाटचाल करू,’ अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाडिक यांच्या ताराराणी चौकातील कार्यालयात आयोजित मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार हसन मुश्रीफ होते. महाडिक म्हणाले, पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दिलेल्या संधीचे सोने करीत मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावू शकलो. आतापर्यंत झालेल्या मेळाव्यांना चांगला प्रतिसाद मिळत असून, भाजप सरकारविरोधात जनतेत संताप आहे. कोल्हापूर शहर मोठे आहे. शहरातील वातावरण संपूर्ण जिल्ह्यात पसरते; पण पक्षात समज-गैरसमज आहेत. कोल्हापूर शहरातील मंडळींशी चर्चा करून मार्ग काढूया. चुका पदरात घेऊन पुढील वाटचाल करूया.
आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, येत्या दोन-तीन दिवसांत आघाडीचे चित्र स्पष्ट होईल. तोपर्यंत आपल्या स्तरावरून प्रचार यंत्रणा अधिक गतिमान करायची आहे. भाजप सरकारच्या काळात संविधान धोक्यात आले असून, ते वाचविण्यासाठी सर्वांनी मतभेद विसरून एकसंधपणे सामोरे गेले पाहिजे. स्थानिक प्रश्नांवर नव्हे तर देशाच्या प्रश्नांवर ही निवडणूक होणार असून, येथून धनंजय महाडिक महत्त्वाचे नाहीत. शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी कामाला लागायचे आहे. सत्ता गेल्यानंतर सगळ्यांचीच भाजली आहे. त्यांच्या हातून काही चुका झाल्या असतील त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यामुळे बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवून त्यांच्या विजयासाठी प्रयत्न करूया.
आमदार संध्यादेवी कुपेकर म्हणाल्या, आपल्याच माणसांवर नाराज व्हायचे असते. ही नाराजी फार काळ नसते. चंदगड मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून, येथून मोठे मताधिक्य देण्यास कटिबद्ध आहे. शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी स्वागत केले.
जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी प्रास्ताविक केले. कार्याध्यक्ष अनिल साळोखे, के. पी. पाटील, बी. एन. पाटील-मुगळीकर, मधुकर जांभळे, आदिल फरास यांनी मनोगत व्यक्त केले. बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, भैया माने, युवराज पाटील, संगीता खाडे, जहिदा मुजावर, रोहित पाटील, आदी उपस्थित होते.
प्रकाश आंबेडकरांची वैचारिक भूमिका काय?
प्रकाश आंबेडकरांना चार जागा देण्याची तयारी होती; पण त्यांनी २१ जागा मागितल्या. यावरून आंबेडकर यांची वैचारिक भूमिका काय आहे, हे स्पष्ट होते असे मुश्रीफ यांनी सांगितले.
अक्षतांना ‘पाटील’ आले, तर नको कसे म्हणायचे?
नाराजी आता संपली आहे; त्यामुळे त्याबद्दल जाहीर वाच्यता करायची नाही. आम्ही प्रचारात आघाडीवर राहूच; पण कॉँग्रेसच्या नेत्यांच्या दारात जाऊन त्यांनाही सोबत घेऊ. आमच्या मुलग्याचे लग्न आहे, शेजारच्या गावातील पाटील अक्षताला येणार असतील तर नको कसे म्हणायचे? अशी मिश्कील टिप्पणी के. पी. पाटील यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता केली. यावर, ‘पुढेही (विधानसभेला) तसेच आहे का?’ असा टोला मुश्रीफ यांनी हाणला.
महापौर, लाटकर यांची पाठ
या बैठकीला राष्ट्रवादीचे बहुतांश नगरसेवक उपस्थित होते; पण राष्ट्रवादीच्या महापौर सरिता मोरे, राजेश लाटकर यांनी पाठ फिरविली. त्याची चर्चा उपस्थितांमध्ये होती.