केरळला दोन ट्रक भरुन अंडरवेअर पाठविणार : धनंजय महाडिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 04:06 PM2018-08-21T16:06:35+5:302018-08-21T16:09:41+5:30
केरळमध्ये पूरपरिस्थिती गंभीर बनली असताना तेथे अत्यंत आवश्यक असणारे अंडरवेअर दोन ट्रक भरुन पाठविणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. ‘लोकमत’च्या १४ व्या वर्धापनदिनानिमीत्त मंगळवारी त्यांनी कोल्हापूर शहर कार्यालयास भेट देऊन सदिच्छा दिली. त्याप्रसंगी त्यांनी ही माहिती दिली.
कोल्हापूर : केरळमध्ये पूरपरिस्थिती गंभीर बनली असताना तेथे अत्यंत आवश्यक असणारे अंडरवेअर दोन ट्रक भरुन पाठविणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.
‘लोकमत’च्या १४ व्या वर्धापनदिनानिमीत्त मंगळवारी त्यांनी कोल्हापूर शहर कार्यालयास भेट देऊन सदिच्छा दिली. त्याप्रसंगी त्यांनी ही माहिती दिली.
केरळ येथे पूरपरिस्थिती गंभीर बनल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. केरळ येथे झालेल्या महाप्रलयाला देशभरातून मोठ्या प्रमाणावर मदतीचा ओघ वाढत असतानाही राज्यातूनही मदत पाठवली जात आहे. तेथे वस्तूंचे जतन करण्यापेक्षा नागरीकांचा जीव वाचविण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे, त्यासाठी पूरात आडकलेल्यांना फक्त अंगावरील कपड्यानिशी उचलून विमानातून सुरक्षीत ठिकाणी स्थलांतरीत केले आहे.
त्यामुळे अनेकांचे साहीत्य हे पूरात वाहून गेले आहे. अशा स्थलांतरीतांना राज्यभरातून अन्नधान्य स्वरुपात मदत मिळत आहे. पण अंघोळीची अंडरवेअर त्यांच्याकडे नसल्याने अनेकांची कुचंबना होत आहे. त्यासाठी आपण कोल्हापूरातून सुमारे दोन ट्रक भरुन अंडरवेअर पाठविणार असल्याची माहिती खा. महाडिक यांनी यावेळी दिली.
कार्यालयात भेटीदरम्यान खा. महाडिक यांनी ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांना शुभेच्छा दिल्या. तर मुख्य बातमीदार विश्वास पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी शहर कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.