Kolhapur: धनंजय महाडिक यांनी मुलाला समजून सांगावे, राजेश क्षीरसागर यांचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 04:42 PM2024-09-30T16:42:59+5:302024-09-30T16:43:52+5:30
कोल्हापूर : खासदार धनंजय महाडीक यांचे पुत्र कृष्णराज महाडीक यांनी कोल्हापूर उत्तरमध्ये निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी ...
कोल्हापूर : खासदार धनंजय महाडीक यांचे पुत्र कृष्णराज महाडीक यांनी कोल्हापूर उत्तरमध्ये निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी खासदार धनंजय महाडीक यांनी मुलाला समजून सांगितले पाहिजे, असा सल्ला राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी येेथे दिला.
क्षीरसागर म्हणाले, गेल्या अडीच वर्षांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात अधिकाधिक विकासकामे केली आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळी माझा मुलगा ऋतुराज क्षीरसागर याने पाच हजार कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. त्यानेही दक्षिण विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती; पण मी त्याला समजून सांगितले आहे. महायुती एकत्र लढणार असल्याने मी जसे माझ्या मुलाला समजावून सांगितले तसे महाडीक यांनी त्यांच्या मुलाला समजावून सांगितले पाहिजे.
मी तयारीला लागलो
क्षीरसागर म्हणाले, मी सलग दोन वेळा शिवसेनेचा आमदार म्हणून निवडून आलो आहे. गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यासाठी मोठा निधी आणला आहे. जनतेने मला स्वीकारले असून सर्व्हेमध्ये माझे नाव सर्वांत पुढे आहे. कोल्हापूर उत्तरमध्ये तिकीट कोणाला मिळणार याचा मी विचार केला नसून मी निवडणुकीच्या तयारीला लागलो आहे. महायुतीतील नेत्यांनी मतभेद होईल, असे वर्तन करू नये.
जिथे काँग्रेस प्रबळ, तेथे सर्वांनी ताकदीने लढायचे
जिथे काँग्रेस प्रबळ आहे, तेथे महायुतीतील सर्वांनी ताकदीने लढायचे आहे. आपापसांत आडवे येण्याची संस्कृती आता बदलली पाहिजे. इच्छा व्यक्त करण्याचा अधिकार सर्वांना आहे; पण ती मागणी योग्य रीतीने, दुजाभाव, मतभेद होता कामा नये, याची काळजी घेतली पाहिजे.