धनंजय महाडिकांनी पार्किंगमध्ये गाळे पाडून विकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 19:00 IST2021-03-06T18:55:37+5:302021-03-06T19:00:01+5:30
Politics Satej Gyanadeo Patil Dhananjay Bhimrao Mahadik kolhapur-माजी खासदार धनंजय महाडिक यांनी आमच्या नेत्यांची मापे काढू नयेत. सोलापूर जिल्ह्यातील भीमा कारखान्याच्या कर्मचाऱ्यांची आणि उूस उत्पादकांची थकवलेली देणी त्यांनी जर आठ दिवसात दिली नाहीत तर कारखान्यासमोर आमचे कार्यकर्ते उपोषणाला बसतील असा प्रतिइशारा माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांनी दिला.

धनंजय महाडिकांनी पार्किंगमध्ये गाळे पाडून विकले
कोल्हापूर हॉटेल सयाजी प्रशासन आणि डीवायपी मॉल यांना कोल्हापूर महापालिका प्रशासनाने जे जे कर लावले ते ते कर भरलेले आहेत. मात्र ज्यांनी आपल्या व्यावसायिक इमारतींच्या पार्किंगमध्ये गाळे पाडून विकले त्या माजी खासदार धनंजय महाडिक यांनी आमच्या नेत्यांची मापे काढू नयेत. सोलापूर जिल्ह्यातील भीमा कारखान्याच्या कर्मचाऱ्यांची आणि उूस उत्पादकांची थकवलेली देणी त्यांनी जर आठ दिवसात दिली नाहीत तर कारखान्यासमोर आमचे कार्यकर्ते उपोषणाला बसतील असा प्रतिइशारा माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांनी दिला.
धनंजय महाडिक यांनी शनिवारी सकाळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी दहा कोटींचा घरफाळा बुडवल्याचा आरोप केला होता. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पाटील समर्थकांनी संध्याकाळी तातडीने पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी महाडिक यांच्या कारभाराचाही पंचनामा केला.
देशमुख म्हणाले, डीवायपी मॉल असो किंवा ड्रीम वर्ल्ड असो महापालिकेने जेवढा फाळा लावला तेवढा भरला गेला आहे. बाकी त्यातील जे काही आरोप आहेत तो भाग महापालिका प्रशासनाचा आहे. आमचा नाही. परंतू यानिमित्ताने महाडिक यांचा जो कारभार तो सांगण्याची आम्हांला संधी मिळाली. आदर्श भीमा वस्त्रम या इमारतीच्या पार्किंगमध्ये व्यवसाय केला जात आहे.
महाडिक येथील भागिदार आहेत. या ठिकाणी बीलेही दुसऱ्या कंपनीच्या नावावर होतात. ताराबाई पार्क येथील कृष्णा सेलिब्रिटी येथे माजी खासदारांनी पार्किंगच्या जागेत गाळे पाडून ते विकले आहेत. अशाप्रकारे गाळेधारक आणि महापालिकेची महाडिक यांनी फसवणूक केली आहे.
देशमुख म्हणाले, भीमा एज्युकेशन सोसायटी, पेट्रोलपंप, हॉस्टेल, घोडे तबेला या ठिकाणी भोगवटा धारक असणाऱ्या महाडिक यांनी कागल नगरपरिषदेचाही फाळा भरलेला नाही.