धनंजय महाडिकांनी पार्किंगमध्ये गाळे पाडून विकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:22 AM2021-03-07T04:22:08+5:302021-03-07T04:22:08+5:30
कोल्हापूर : हॉटेल सयाजी प्रशासन आणि डीवायपी मॉल यांना कोल्हापूर महापालिका प्रशासनाने जे जे कर लावले ते सर्व कर ...
कोल्हापूर : हॉटेल सयाजी प्रशासन आणि डीवायपी मॉल यांना कोल्हापूर महापालिका प्रशासनाने जे जे कर लावले ते सर्व कर त्यांनी भरले आहेत. आपल्या व्यावसायिक इमारतींच्या पार्किंगमध्ये गाळे पाडून विकले त्या माजी खासदार धनंजय महाडिक यांचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. भीमा कारखान्याच्या कर्मचाऱ्यांची आणि ऊस उत्पादकांची थकविलेली देणी त्यांनी जर आठ दिवसांत दिली नाहीत तर आमचे कार्यकर्ते उपोषणाला बसतील, असा प्रतिइशारा स्थायी समितीचे माजी सभापती शारंगधर देशमुख यांनी शनिवारी येथे दिला.
धनंजय महाडिक यांनी शनिवारी सकाळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी दहा कोटींचा घरफाळा बुडविल्याचा आरोप केला होता. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पाटील समर्थकांनी संध्याकाळी तातडीने पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी महाडिक यांच्या कारभाराचाही पंचनामा केला.
देशमुख म्हणाले, डीवायपी मॉल असो किंवा ड्रीम वर्ल्ड असो महापालिकेने जेवढा फाळा लावला तेवढा भरला आहे. बाकी त्यातील जे काही आरोप आहेत तो भाग महापालिका प्रशासनाचा आहे, आमचा नाही. महाडिक भागीदार असलेल्या भीमा वस्त्रमच्या पार्किंगमध्ये व्यवसाय केला जात आहे. ताराबाई पार्कातील कृष्णा सेलिब्रिटी येथे माजी खासदारांनी पार्किंगच्या जागेत गाळे पाडून ते विकले आहेत.
देशमुख म्हणाले, भीमा एज्युकेशन सोसायटी, पेट्रोलपंप, हॉस्टेल, घोडे तबेला या ठिकाणी भोगवटाधारक असणाऱ्या महाडिक यांनी कागल नगरपरिषदेचाही घरफाळा भरलेला नाही. पंढरपूर येथील भीमा साखर कारखान्याचे अध्यक्ष असलेल्या महाडिक यांनी कामगारांचा २१ महिन्यांचा पगार दिलेला नाही, २० महिन्यांचा प्रॉव्हिडंट फंड भरलेला नाही, निवृत्त कर्मचाऱ्यांचे सात कोटी रुपये दिलेले नाहीत. ८० लाखांचे वाहतूक बिल दिलेले नाही. हंगामी कर्मचाऱ्यांचा चार वर्षांपासूनचा बेकार भत्ता दिलेला नाही. चालू हंगामातील जानेवारी, फेब्रुवारीची बिले दिलेली नाहीत. ही देणी आठ दिवसांत दिली नाहीत, तर पंढरपूरमधील आमचे कार्यकर्ते कारखान्याच्या दारात उपोषणाला बसतील.
यावेळी माजी महापौर निलोफर आजरेकर, भूपाल शेटे, सचिन चव्हाण, संजय मोहिते, डॉ. संदीप नेजदार, दुर्वास कदम, अर्जुन माने, प्रा. महादेव नरके यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
चौकट -
चौथ्या मजल्यावर गोठा कसा
महाडिक यांच्या आदर्श भीमा वस्त्रम इमारतीच्या चौथ्या मजल्यावर गोठा दाखविण्यात आला आहे. जगातील हे एकमेव उदाहरण असावे. महाडिक यांच्याकडे असा गोठा उभारण्याची यंत्रणा असेल तर कोल्हापूरसाठी ते फायद्याचे ठरेल, असा टोलाही देशमुख यांनी यावेळी लगावला.
चौकट
या तर चोराच्या उलट्या बोंबा
महादेवराव महाडिक १८ वर्षे आमदार होते, धनंजय महाडिक पाच वर्षे खासदार होते. त्यांनी महापालिकेला एक रुपयाचा निधी दिला नाही. विकासासाठी एकही प्रकल्प उभारला नाही. व्यवसायासाठी आलेल्या महाडिक यांनी राजाराम कारखाना, गोकुळमध्ये घुसखोरी केली आणि कारखाना उभारताना मात्र कर्नाटकात केला, असा आरोपही यावेळी करण्यात आला.