Dhananjay Mahadik: नाट्यमय घडामोडीत धनं'जय', पराभवाच्या मालिकेनंतर अखेर महाडिकांना गुलाल लागला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2022 11:37 AM2022-06-11T11:37:53+5:302022-06-11T11:38:29+5:30

राजकीय पटलावरील ताकदवान असणाऱ्या महाडिक कुटूंबाच्या राजकारणाला गेल्या काही वर्षापासून घरघर लागल्याचे चित्र पहावयास मिळाले. मात्र अखेर ही घरघर संपली.

Dhananjay Mahadik victory in Rajya Sabha elections after four defeats | Dhananjay Mahadik: नाट्यमय घडामोडीत धनं'जय', पराभवाच्या मालिकेनंतर अखेर महाडिकांना गुलाल लागला

Dhananjay Mahadik: नाट्यमय घडामोडीत धनं'जय', पराभवाच्या मालिकेनंतर अखेर महाडिकांना गुलाल लागला

googlenewsNext

राजाराम लोंढे

कोल्हापूर : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडीकडे पुरेशी मतं असतानाही त्या ठिकाणी भाजपच्या धनंजय महाडिकांनी बाजी मारली. महाडिकांच्या विजयानंतर शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे. लोकसभापासून महाडिक गटाला सातत्याने पराभव पदरी आला होता. चार पराभवानंतर राज्यसभानिवडणूकीच्या निमित्ताने पाचवा गुलाल अखेर धनंजय महाडीक यांना लागला.

एकेकाळी जिल्ह्याच्या राजकारणाच्या नाड्या हातात होत्या. सगळ्या सत्ता ताब्यात असल्याने महाडिक म्हणतील तीच जिल्ह्याच्या राजकारणाची पुर्व दिशा असे समीकरण अनेक वर्षे होते. राजकीय पटलावरील ताकदवान असणाऱ्या महाडिक कुटूंबाच्या राजकारणाला गेल्या काही वर्षापासून घरघर लागल्याचे चित्र पहावयास मिळाले.

धनंजय महाडीक यांचा राजकीय प्रवास तसा खडतरच होता. २००४ ची लोकसभेतील पराभव, २००९ च्या निवडणूकीत तयारी करुनही घ्यावी लागलेली माघार, २००९ च्या विधानसभा निवडणूकीतील पराभवानंतर २०१४ ते लोकसभेला विजयी झाले. लोकसभेत संधी मिळाल्यानंतर त्याचे सोने करण्याचे काम त्यांनी केले. संसदेतील एक अभ्यासू खासदार म्हणून त्यांनी पाच वर्षात छाप पाडली होती. संसदरत्न पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले. कामाच्या पातळीवर ते आघाडीवर राहिले, मात्र जिल्ह्यातील राजकारणात त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे शत्रू वाढत गेले.

राष्ट्रवादीला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश

कोणी कितीही विरोध केला तरी पाच वर्षात केेलेली कामे व संसदेमधील कामगिरीच्या बळावर कोल्हापूरची जनता आपणाला पुन्हा संधी देईल. असा विश्वास त्यांना होता. मात्र ‘आमचं ठरलयं’ म्हणून पालकमंत्री सतेज पाटील यांनी महाडिक विरोधकांची मोट बांधली आणि शिवसेनेचे संजय मंडलिक यांचा विजयी झाला. लोकसभेतील पराभवानंतर महाडिक यांनी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. तत्पुर्वी महाडीक कुटूंब भाजपमध्ये होतेच, धनंजय महाडीक यांच्या रुपाने भाजपची ताकद वाढली. भाजपने त्यांना प्रदेश उपाध्यक्ष, प्रवक्ते अशा पदावर काम करण्याची संधी दिली.

लोकसभेतील पराभवानंतर विधानसभेत अमल महाडीक यांचा पराभव झाला. विधानपरिषदेलाही ऐन वेळी माघार घ्यावी लागली. अनेक वर्षाची सत्ता असलेला ‘गोकुळ’ दूध संघ हातातून गेला. त्यानंतर कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणूकीत सत्यजीत कदम यांचा पराभव झाला. या सगळ्यामुळे महाडीक गटात काहीसी मरगळ आल्याचे चित्र होते. मात्र अचानकपणे राज्यसभेसाठी धनंजय महाडिक यांचे नाव पुढे आले आणि भाजपसह महाडीक गटाला धक्काच बसला.

भाजपची मोठी खेळी

भाजपने कोल्हापूरातीलच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्याविरोधात महाडीक यांना सहावा उमेदवार म्हणून उतरण्याची मोठी खेळी खेळली. या जागेवर निवडून येणे तसे जोखमीचे होते. मात्र अशा निवडणूका कशा खेचून आणायच्या याची चांगलीच माहिती धनंजय महाडिक यांना होती. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लावलेल्या जोडण्या यशस्वी झाल्या आणि तब्बल आठ वर्षानंतर हुलकावणी दिलेला अखेर गुलाल महाडिक यांच्या अंगावर विजयाचा पडला.

दोन वेळा संसदरत्न.....

पाच वर्षात अतिशय आक्रमकपणे कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील प्रश्न त्यांनी संसदेत मांडले. कोणत्याही विषयावर अभ्यासपुर्ण मांडणी त्यांनी केल्याने त्यांना दोन वेळा संसदरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याचबरोबर याच कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीतील सदस्य म्हणून त्यांनी काम केले. यानिमित्ताने ते खासदार शरद पवार यांच्या अत्यंत जवळचे म्हणून त्यांनी विश्वास संपादन केला होता.

Web Title: Dhananjay Mahadik victory in Rajya Sabha elections after four defeats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.