Kolhapur: ‘थेट पाईपलाईन’च्या कामात गौडबंगाल; मोदी, शहा यांच्याकडे चौकशीची मागणी करणार - धनंजय महाडिक
By भारत चव्हाण | Published: March 13, 2024 02:09 PM2024-03-13T14:09:06+5:302024-03-13T14:10:42+5:30
पुईखडी शुद्धीकरण केंद्राला भेट देऊन घेतली माहिती
कोल्हापूर : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेच्या कामात प्रथम दर्शनी खूप काही गौडबंगाल व घोटाळा दिसतोय, म्हणून या योजनेची केंद्रीय स्तरावरील तज्ज्ञ समिती मार्फत चौकशी करावी, अशी मागणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृह मंत्री अमित शहा व या खात्याचे संबंधित मंत्री यांच्याकडे चौकशीची मागणी करणार आहे, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली. या योजनेच्या आतापर्यंत झालेल्या कामाची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
खासदार महाडिक यांनी बुधवारी सकाळी सत्यजित कदम तसेच भाजप-ताराराणी आघाडीच्या माजी नगरसेवक, भाजपचे कार्यकर्ते यांच्यासह पुईखडी येथील जलशुद्धीकरण केंद्रावर जाऊन थेट पाईपलाईन योजनेच्या कामाची अधिकाऱ्यांशी चर्चा करुन माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांना माहिती दिली.
थेट पाईपलाईन योजनेचे पाणी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आले आहे. परंतू तेथून पुढे नागरिकांच्या घरापर्यंत जाण्यासाठीची वितरण व्यवस्था अस्तीत्वात नाही. त्यामुळे शहराच्या अनेक भागात पाण्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे मला नागरिकांच्या तक्रारीवरुन या प्रश्नात लक्ष घालावे लागत असल्याचे महाडिक यांनी सांगितले.
श्रेय घेण्याचा बालिश प्रयत्न
या योजनेत केंद्र सरकारचा ६० टक्के तर राज्य सरकारचा २० टक्के निधी खर्च झाला आहे. २० टक्के रक्कम खर्च करुन त्यांनी श्रेय घेण्याच्या प्रयत्न केला आहे. विद्यमान पालकमंत्रीही नाराज झाले आहेत. स्वत:च जाऊन त्यांनी पाण्यात अंघोळ केली. श्रेय घेण्याचा हा बालिश प्रयत्न असल्याचे महाडिक म्हणाले.