धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा : चंद्रकांत पाटील यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 07:52 PM2021-01-13T19:52:14+5:302021-01-13T20:00:13+5:30
Politics chandrakant patil Kolhapur- महाराष्ट्राच्या राजकारणात नुसते आरोप झाले तर मंत्री स्वत:हून राजीनामा देतात. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या कृत्याचा स्वत:हून कबुलीनामा दिला आहे, संवेदनशील मंत्री असल्याने ते राजीनामा देतील. त्यांनी दिला नाहीतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा घ्यावा, त्यांनी घेतला नाहीतर मग भाजप राज्यभर आंदोलन करेल, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला.
कोल्हापूर : महाराष्ट्राच्या राजकारणात नुसते आरोप झाले तर मंत्री स्वत:हून राजीनामा देतात. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या कृत्याचा स्वत:हून कबुलीनामा दिला आहे, संवेदनशील मंत्री असल्याने ते राजीनामा देतील. त्यांनी दिला नाहीतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा घ्यावा, त्यांनी घेतला नाहीतर मग भाजप राज्यभर आंदोलन करेल, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला. विधानसभेवेळी निवडणूक आयोगाला खोटी माहीती दिल्याने त्यांची निवडणूक रद्द होऊ शकते, असेही पाटील यांनी सांगितले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, धनंजय मुंडे यांच्याबाबत झालेली तक्रारी आणि त्यांनी दिलेला कबुलीनामा, अशा प्रकारची कॅबीनेट मंत्र्यांच्या बाबतची घटना महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच घडली आहे. संबंधित महिलेने अत्याचाराबाबत केलेल्या आरोपाची पोलीस शहानिशा करतील, त्यातून काय व्हायचे ते होईल. आरोप चुकीचे असतील तर त्या महिलेवर कारवाई होईल. मात्र तक्रार केलेल्या महिलेच्या बहिणीशी त्यांचे पंधरा वर्षे असलेले सबंध, त्यातून दोन मुले झाल्याची कबुली मुंडे यांनी दिली. हे सर्व नैतिकता आणि कायदा या दोन्हीच्या चौकटीत बसत नाही.
पवार यांचे राजकारण शुध्द
राष्ट्रवादीने मुंडेंचा राजीनामा घ्यायचा का त्यांना उठाबशा काढायला लावायच्या हा त्यांचा प्रश्न आहे. पण शरद पवार यांनी ५० वर्षात एकाला बाजूला करून दुसऱ्याला घेतले, हा राजकारणाचा भाग सोडला तर शुध्द राजकारण केले. त्यामुळे ते निर्णय घेतील, असे पाटील यांनी सांगितले.
जयंतराव, जनता तुम्हाला माफ करणार नाही
मुंडे यांच्यावरील आरोप अद्याप सिध्द झाले नसल्याने राजीनाम्याची गरज नसल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे वक्तव्यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, केलेल्या गुन्ह्याची स्वत: कबुली दिल्यानंतर चौकशी कसली करता..? मित्र म्हणून माफी देणार असाल तर ठीक आहे, मात्र जनता तुम्हाला माफ करणार नाही.