मंडलिकांनी पाडलेले महाडिक म्हणताहेत, संजयदादा तुम आगे बढो
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 11:50 AM2024-04-11T11:50:35+5:302024-04-11T11:51:35+5:30
चंद्रकांत पाटील उवाच : क्षीरसागरांचं आणि माझं भांडण होतंच की..
कोल्हापूर : गुढीपाडव्याचा दिवस. मंगळवार, दि. ९ एप्रिल. भर दुपारची वेळ. खाडेंच्या शाहूपुरीतील बंगल्याबाहेर मंडप उभारलेला. संजय मंडलिक यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन हाेतं. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांची सर्व जण वाट पाहत होते. मंडलिक कार्यकर्त्यांना भेटत होते. बोलत होते. नेत्यांची प्रतीक्षा करत होते.
एवढ्यात एक-एक करत सर्व जण आले. मंडलिकांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालं मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते. इथं खासदार धनंजय महाडिक यांनाही आवर्जून नारळ फोडायला लावण्यात आला. नेते व्यासपीठावर बसले. आगत स्वागत झालं. भाषणं सुरू झाली. पाटील यांना पुण्याला जायची गडबड असल्यानं ते बोलायला उभे राहिले. ते म्हणाले, आता कसं आहे.
गेल्यावेळी मंडलिक यांनी पराभूत केलेले धनंजय महाडिक आता म्हणतात, चारसो पार. संजयदादा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं. हा झाला समजूतदारपणा, प्रगल्भता आणि आलेल्या परिस्थिला सामोरं जाणं. आता माझं आणि राजेश क्षीरसागरांचं भांडण होतं. हो की नाही क्षीरसागर; पण आता मी क्षीरसागरच्या सगळ्या विषयांत असतो आणि ते माझ्या.
हे सगळं ऐकताना उपस्थितांना अनेक संदर्भ आठवत होते. कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात शड्डू ठोकलेले मंडलिक मुश्रीफ यांच्या शेजारी बसले होते. बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर हे पाठीमागे बसले होते. गेली साडेचार वर्षे एकमेकांचा उद्धार करणारे आणि लोकसभेचा निकाल जाहीर होताच विधानसभेचा एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकणारे मुश्रीफ, समरजित घाटगे एकाच पुढच्या रांगेत बसले होते. ज्या महेश जाधव यांनी क्षीरसागर यांच्याविरोधात विधानसभा लढवली ते दोघेही एकमेकांच्या कानात बोलत होते आणि ज्या मुश्रीफ यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरावर मोर्चा काढला होता ते आता नरेंद्र मोदींसाठी एकत्रित आले.
भाजप-शिंदेसेनेच्या नेत्यांपेक्षा मंत्री मुश्रीफच मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी जास्त अधीर झाल्याचे आणि आता सगळी तळमळ त्यांची त्यासाठीच असल्याचे दिसत होते. बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत के. पी. पाटील यांच्या पराभवासाठी देव पाण्यात घातलेले मंत्री चंद्रकांत पाटील के. पी. यांचे स्वागत करत होते आणि पुढचा मेळावा कसा घेऊ या, याबाबत धनंजय महाडिक मंडलिक यांना सांगत होते. धन्य तो समजतूदारपणा, धन्य ती प्रगल्भता आणि धन्य ते परिस्थितीला सामोरं जाणं.