‘दिलबहार’कडून खंडोबाचा धुव्वा
By admin | Published: January 8, 2016 12:45 AM2016-01-08T00:45:49+5:302016-01-08T00:57:29+5:30
केएसए लीग फुटबॉल : खंडोबाचा ‘ब’ संघही पराभूत; संध्यामठने २-0 ने केली मात
कोल्हापूर : कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन आयोजित के.एस.ए. लीग फुटबॉल स्पर्धेत छत्रपती शाहू स्टेडियमवर गुरुवारी झालेल्या सामन्यात दिलबहार तालीम मंडळ ‘अ’ ने खंडोबा तालीम मंडळ ‘अ’ संघाचा तब्बल ६-० अशा गोलफरकाने धुव्वा उडविला, तर संध्यामठ तरुण मंडळाने खंडोबा तालीम मंडळ ‘ब’वर २-० अशा गोलफरकाने मात केली.
पहिला सामना दिलबहार तालीम मंडळ ‘अ’ विरुद्ध खंडोबा तालीम मंडळ ‘अ’ यांच्यामध्ये खेळविण्यात आला. सामन्याच्या प्रारंभापासूनच दिलबहार तालीम मंडळ ‘अ’ने सामन्यावर वर्चस्व राखले. सामन्याच्या चौथ्याच मिनिटाला दिलबहार तालीम मंडळाच्या सनी सणगरने गोल नोंदवत संघाचे खाते उघडले. पाठोपाठ सातव्या मिनिटाला सनी सणगरने वैयक्तिक दुसरा व संघाचाही दुसरा गोल नोंदवत सामन्यात २-० अशी आघाडी केली. २४व्या मिनिटाला ‘दिलबहार’ संघाच्या सचिन पाटीलने गोल नोंदवत सामन्यात ३-० अशी आघाडी केली. मध्यंतरापर्यंत ही गोलसंख्या कायम राहिली होती.
उत्तरार्धात खंडोबा तालीम मंडळाने आपल्या रणनीतीमध्ये बदल करत थोडा आक्रमक पवित्रा घेतला. यामध्ये ऋतुराज संकपाळ, आशिष चव्हाण, अजिज मोमीन, मनोज फराकटे यांनी खाते उघडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. पण, समन्वच्या अभावामुळे त्यांना अपयश आले. सतत होणारे आक्रमण पाहता ‘दिलबहार’ने पुन्हा एकदा आक्रमकपणे खेळण्यास प्रारंभ केला. यामध्ये ६१व्या मिनिटाला सचिन पाटीलने वैयक्तिक दुसरा व संघाचा चौथा गोल नोंदवत सामन्यात ४-०ने आघाडी घेतली. या आघाडीनंतर ‘दिलबहार’ संघाच्या अनिकेत जाधवने सलग दोन गोल नोंदवीत सामन्यात ६-० अशी भक्कम आघाडी मिळविली.
दुसरा सामना संध्यामठ तरुण मंडळ विरुद्ध खंडोबा तालीम मंडळ ‘ब’ यांच्यामध्ये खेळविण्यात आला. सामन्याच्या प्रारंभापासून दोन्ही संघांनी बचावात्मक खेळी करण्यास सुरुवात केल्याने सामना मध्यंतरापर्यंत गोलशून्य बरोबरीत होता.
उत्तरार्धात संध्यामठ संघाकडून अभिजित सुतार, अक्षय सरनाईक, अमोल पाटील, अतिष पाटील, अक्षय पाटील यांनी, तर खंडोबा तालीम मंडळ ‘ब’कडून प्रवीण पाटील, अक्षय मुळे, प्रणित सावंत, स्वराज पवार, अमर मोरे यांनी खाते उघडण्याचे शर्तीचे प्रयत्न केले, मात्र त्यांना निर्धारीत वेळेत यश आले नाही. सामन्याच्या जादा वेळेमध्ये संध्यामठच्या अभिजित सुतार व सूरज शिंगटे यांनी गोल नोंदवत सामन्यात २-० अशा गोलफरकाने विजय मिळविला. (प्रतिनिधी)
आजचे सामने
४दु. २ वा. - पीटीएम ‘अ’ विरुद्ध शिवनेरी
४दु. ३ वा. पोलीस विरुद्ध गोल्डस्टार स्पोर्टस्