धनगर समाजास सवलती लागू करणार
By admin | Published: September 20, 2015 10:43 PM2015-09-20T22:43:30+5:302015-09-20T23:28:17+5:30
चंद्रकांत पाटील : चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन
इस्लामपूर : धनगर समाजास अनुसूचित जमातीच्या सवलती लागू करण्यास राज्य सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी धनगर समाजाने शासनाला थोडा अवधी द्यावा. या समाजाला केंद्र व राज्य सरकारच्या सोयी-सवलती लागू करण्याचा निर्णय लवकरच करू. तसेच धनगर समाजास आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. याचवेळी त्यांनी चौंडीच्या विकास कामांकरिता मोठा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाहीही दिली.चौंडी (ता. जामखेड) येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २२१ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक़्रमात ते बोलत होते. त्यांच्याहस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या ११ फूट उंचीच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. धनगर समाज महासंघाचे संस्थापक, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आमदार रामहरी रूपनवर, आमदार कपिल पाटील उपस्थित होते.पाटील म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मगाव चौंडी येथे राष्ट्रीय स्मारक करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यासह त्यांच्या जयंतीदिनी ३१ मे रोजी शासकीय सुट्टी जाहीर करण्यासंदर्भात मंत्रिमंडळात चर्चा करू. अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वाचा अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र अभ्यास मंडळ निर्माण करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. अण्णासाहेब डांगे म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे विचार तळागाळात गेले पाहिजेत. सार्वभौम संस्कृतीची निर्मिती त्यांनी केली आहे. त्यांच्याबाबतीत राज्य सरकारच्यावतीने स्वतंत्र लेखन व्हायला हवे. धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नांसंबंधित तांत्रिक बाबींसाठी एक समिती नेमून समाजास अनुसूचित जमातीच्या सोयी-सवलती लागू झाल्या पाहिजेत. आरक्षणाच्या प्रश्नासाठी सत्याग्रही विचाराने आमचा लढा सतत सुरू आहे.श्रीराम पुंढे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी अण्णासाहेब डांगे यांनी लिहिलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. अहिल्यादेवींचा पुतळा भेट दिल्याबद्दल आमदार कपिल पाटील यांचाही सत्कार करण्यात आला.आमदार रुपनवर पाटील, जिल्हाधिकारी अनिल कवडे, डॉ. अलकाताई कोरे, सौ. पुष्पलता गुलवाडे यांची भाषणे झाली. मेळाव्यास आमदार नारायण पाटील, आमदार बाळासाहेब मुरकुटे, अॅड. चिमण डांगे, सुनील मलगुंडे, सुवर्णाताई खरात, नंदाताई शेळके, प्रा. आर. एस. चोपडे यांच्यासह धनगर समाज बांधव उपस्थित होते. बजरंग कदम यांनी सूत्रसंचालन केले. बबनराव रानडे यांनी आभार मानले. (वार्ताहर)
पाठपुरावा करणार
धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नांसंबंधित तांत्रिक बाबींसाठी एक समिती नेमून समाजास अनुसूचित जमातीच्या सोयी-सवलती लागू झाल्या पाहिजेत, अशी मागणी डांगे यांनी केल्यानंतर त्याला उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी, याबाबत पाठपुरावा करून लवकरात लवकर सवलती देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.