राजकारणाचे जोडे बाहेर, आरक्षणासाठी धनगर सारा एक; ३२ पोटशाखा एका झेंड्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2020 07:06 PM2020-10-02T19:06:17+5:302020-10-02T19:06:32+5:30

Dhangar Reservation News: कोल्हापुरातील पहिल्या गोलमेज परिषदेत निर्धार

Dhangar Reservation Meeting held at Kolhapur, Demand for One unity | राजकारणाचे जोडे बाहेर, आरक्षणासाठी धनगर सारा एक; ३२ पोटशाखा एका झेंड्याखाली

राजकारणाचे जोडे बाहेर, आरक्षणासाठी धनगर सारा एक; ३२ पोटशाखा एका झेंड्याखाली

googlenewsNext

कोल्हापूर : आतापर्यंत खूप सोसले, येथून पुढे नाही. राजकारणाचे जोडे बाहेर ठेवूनच ‘एस. टी. प्रवर्गाचे आरक्षण धनगर सारा एक’ या घोषणेसह संपूर्ण समाज पिवळ्या झेंड्याखाली एकवटेल, असा निर्धार शुक्रवारी कोल्हापुरात झालेल्या पहिल्या गोलमेज परिषदेत करण्यात आला. ३२ पोटशाखा आणि तितक्याच संघटना व नेत्यांमध्ये विभागलेला समाज येथून पुढे एकमुखाने आरक्षणाचा लढा लढेल आणि जिंकेल, असा ठरावही टाळ्यांच्या गजरात मंजूर झाला. धनगर समाजाला सध्या असलेले एन. टी. आरक्षण एस. टी. प्रवर्गात मिळावे म्हणून आता आरपारची लढाई करण्यासाठी वज्रमूठ यावेळी बांधण्यात आली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेत धनगर आरक्षण समन्वय समितीची कावळा नाका येथील मंगल कार्यालयात गोलमेज परिषद झाली. आपला लढा सनदशीर मार्गाने लढण्यासाठी म्हणून गांधीजयंतीचा मुहूर्त साधून भरवलेल्या या परिषदेत राज्यातील समाजाचे प्रमुख नेते सहभागी झाले. दिवसभर चाललेल्या या परिषदेची सुरुवात सकाळी आरक्षणाचे प्रणेते आणि सामाजिक क्रांतीचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या दसरा चौकातील पुतळ्यास अभिवादनाने झाली.

माजी मंत्री अण्णा डांगे, राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही परिषद झाली. आपल्यात दुही असता कामा नये, एकजुटीने आवाज उठवला तरच सरकारवर दबाब येणार आहे, अन्यथा कधीही आरक्षण मिळणार नाही हे लक्षात ठेवा, असा इशाराही परिषदेने दिला.
समन्वय समितीचे निमंत्रक संदीप कारंडे, रामराव वरकुटे, शशिकांत तरंगे, बयाजी शेळके, राजेंद्र कोळेकर यांनी थेट सहभाग घेतला; तर रामहरी रूपनवर, गणेश ठाके, बबन रानगे, अशोक कोळेकर, कल्लाप्पा गावडे हे व्हीसीद्वारे सहभागी झाले.

माजी मंत्री अण्णा डांगे म्हणाले, मराठा समाज आरक्षण मिळवण्यासाठी एकत्र येतो, मग आपण का नाही? आपणही एकत्र येऊन अडवणूक का होत आहे याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. ही एकट्या-दुकट्याची लढाई नाही, हे नेता होऊ पाहणाऱ्याने लक्षात घ्यायला हवे.

माजी मंत्री राम शिंदे म्हणाले, राज्यघटनेनेच दिलेले आरक्षण न मिळण्यामागे आपल्यातील दुहीच कारणीभूत आहे. नेता, पक्ष, गट-तट बाजूला ठेवून एकत्र आल्याशिवाय सरकारचे डोळ उघडणार नाहीत. आपला दबाबगट तयार झाला तरच आरक्षणाचे फळ मिळेल, अन्यथा नाही.

दिल के टुकडे हजार...

दिल के टुकडे हुए हजार; एक यहां गिरा, एक वहां, अशा काव्यपंक्ती उद‌्धृत करीत अण्णा डांगे यांनी धनगर समाजातील गटबाजीवर परखड भाष्य केले. या वयातही डांगे यांनी आपल्या खास परखड शैलीत नेत्यांना खडे बोल सुनावले.

परिषदेतील ठराव
१ ‘धनगर सारा एक’ या भावनेतून ३२ पोटशाखा, संघटना एकत्र येणार

२ गोलमेज परिषदेची व्याप्ती वाढवण्यासाठी पुन्हा एकदा संघटनांची बैठक

३ शेळ्या-मेंढ्या चोऱ्या रोखण्यासह चराई व संरक्षण कायद्याची मागणी

४ उच्च न्यायालयातील सुनावणी रोजच्या रोज होऊन निकाली काढावी

Web Title: Dhangar Reservation Meeting held at Kolhapur, Demand for One unity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.