रानमेव्याच्या मार्केटिंगमध्ये धनगर महिलांचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 12:17 AM2019-06-05T00:17:07+5:302019-06-05T00:17:11+5:30
आंबा : ‘रानचा मेवा कुणी बी खावा’ अशी आरोळी देत करवंद, जांभळे विक्री करणारा धनगर समाज एप्रिल व मे ...
आंबा : ‘रानचा मेवा कुणी बी खावा’ अशी आरोळी देत करवंद, जांभळे विक्री करणारा धनगर समाज एप्रिल व मे महिन्यांत कुटुंबासह उदरनिर्वाहासाठी म्हणून हा व्यवसाय करतो. कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवरील शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावडा, आजरा, चंदगड या डोंगराळ भागात पिढ्यान्पिढ्या वास्तव्य केलेला धनगर समाज जंगलातील करवंद, जांभळे, तोरणे, आळू, फणस , शिकेकाई यांची विक्री करून वर्षभराच्या पोटाची बेगमी करण्यात दिवसरात्र एक करतो.
तहान-भूक विसरून चिकाटीने ग्राहकांना रानमेवा पुरवितात. शिकलेला तरुण नोकरीसाठी मुंबई गाठतो. मात्र, येथे राहणाऱ्या महिला रानमेव्याच्या सुगीत भल्या पहाटे
डोंगर गाठून ३-४ किलोमीटरची पायपीटकरून २० ते २५ किलोचा रानमेवा जमवतात. करवंदागणिक काट्यांचे बोच सोसत ऊन डोक्यावर येण्यापूर्वी शेजारच्या बाजारात विक्रीसाठी दाखल होतात. पुरुष मंडळी ७० ते ८० किलोमीटरचा प्रवास करून कोल्हापूर, इस्लामपूर, सांगली, वडगावसारख्या शहरात डोक्यावर पाटी घेऊन घरोघरी रानमेवा विकतात. शहरातून परतणारी मंडळी मध्यरात्रीनंतर घरात विसावतात. बहुतेक वाड्यांवर नेमके या सुगीत पाणीटंचाई डोके वर काढते. त्यामुळे पाण्यासाठी रात्रीची झºयाकडे पायपीट करावी लागत असल्याची खंत बोरमाळच्या बजाबाई कोकरे यांनी व्यक्त केली. रानमेवा सुगी वगळता काही मंडळी तवे, पत्र्याच्या पाट्या विकण्याचा व्यवसाय करतात.
गेल्या दोन दशकांत वणवे, प्लॉटिंगमुळे रानमेव्याची झाडे कमी झाली आहेत. महामार्ग रुंदीकरणात गावठी आंबे, फणस, जांभूळ यांची तोड झाल्याने पाटीभर रानमेवा जमवण्यास ३ ते ४ किलोमीटरची पायपीट करावी लागते, असे बोरमाळ येथील सिंधू लांबोर यांनी स्पष्ट केले. पिढ्यान्पिढ्या हा हंगामी व्यवसाय चालतो. वर्षांनुवर्षे झाडे कमी होत असल्याने पन्नास टक्क्यांवर हा व्यवसाय घटल्याचे ग्रा.पं. सदस्या नंदा कोळा पटे यांनी सांगितले.