दक्षिण महाराष्ट्रात कोसळ‘धार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:15 AM2021-07-23T04:15:38+5:302021-07-23T04:15:38+5:30
कोल्हापूर/सातारा/ सांगली: दक्षिण महाराष्ट्रात सोमवारी रात्री सुरू झालेल्या पावसाच्या संततधारेने बुधवारी रात्रीपासून कोसळ‘धारे’चे स्वरूप धारण केल्याने कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांत ...
कोल्हापूर/सातारा/ सांगली: दक्षिण महाराष्ट्रात सोमवारी रात्री सुरू झालेल्या पावसाच्या संततधारेने बुधवारी रात्रीपासून कोसळ‘धारे’चे स्वरूप धारण केल्याने कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांत दाणादाण उडाली आहे. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातील ओढे, नाले, तुडुंब भरून वाहू लागले असून सर्वच नद्या पात्राबाहेर पडल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे अनके मार्ग वाहतुकीसाठी बंद झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
कोल्हापुरात पंचगंगेने धोका पातळीच्या दिशेने : १०३ बंधारे पाण्याखाली : एनडीआरएफ दाखल
कोल्हापूर : गुरुवारी सकाळपर्यंत झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर आला आहे. पंचगंगा नदीने ३९ फूट ही इशारा पातळी ओलांडली असून ४३ फूट या धोकापातळीच्या दिशेने ती वेगाने झेपावत आहे. जिल्ह्यातील १०३ बंधारे पाण्याखाली गेले असून कोल्हापूर ते रत्नागिरी, गगनबावडा, कागल-मुरगूड, गारगोटी, गडहिंग्लज, चंदगड असे प्रमुख राज्यमार्ग वाहतुकीसाठी पूर्ण बंद झाले आहेत. पूरस्थिती निर्माण होत असल्याने एनडीआरएफच्या दोन तुकड्या दाखल झाल्या आहेत. बर्की (ता. शाहूवाडी) गावाचा संपर्क तुटला असून संध्याकाळपर्यंत संपर्क तुटलेल्या गावांची संख्या आणखी वाढणार आहे.
चौकट
ढगफुटीसदृश पाऊस
जिल्ह्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रासह डोंगराळ तालुक्यात तर ढगफुटीसदृश अवघ्या काही तासांतच विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. राधानगरी धरण ६६ टक्के भरले आहे. सध्या फक्त सांडव्यावरून भोगावती नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पाणीपातळीत वाढ होत आहे.
चौकट
आलमट्टीतून ९७ हजार क्यूसेक विसर्ग
पाऊस वाढल्याने आलमट्टी धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. सद्यस्थितीत प्रतिसेकंद ९७ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने कोल्हापूर, सांगलीतील पंचगंगा, कृष्णेचे पाणी वेगाने पुढे सरकत आहे.
सातारा जिल्ह्यात धुवाधार: पूल वाहून गेले, वाहतूक बंद
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात धुवाधार पावसाने दाणादाण उडवली असून कोयना धरणात ३३ तासांत १५ टीएमसीहून अधिक पाणीसाठा वाढला. त्यामुळे गुरुवारी सायंकाळच्या सुमारास पाणीसाठा ७२.८९ टीएमसी झाला होता. या पावसामुळे पश्चिम भागात रस्ते खचणे, पूल वाहून जाण्याने वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली आहे.
जिल्ह्यातील कोयना, नवजा, महाबळेश्वर, पाटण, बामणोली, तापोळा भागांत पावसाने दाणादाण उडवली आहे. महाबळेश्वर तालुक्यातील पश्चिम भागात चतुरबेट येथील कोयना पूल पाण्याखाली गेला आहे. वाई तालुक्यातील गाढवेवाडी येथे पुलाला भगदाड पडले. नांदगणेला पूल वाहून गेला आहे. पसरणी घाटात दरड कोसळली. महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावर आंबेनळी घाटात पुलाची बाजू खचली आहे. जावळी तालुक्यातील केळघर येथे पुलाचा भराव वाहून गेला आहे. कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून गुरुवारी दुपारपासून २१०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. तसेच पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी कण्हेर, उरमोडी या धरणांमधूनही विसर्ग सुरू झाला आहे.
चौकट :
कोयनेच्या दरवाजातून आज विसर्ग !
कोयना धरणात ३३ तासांत १५.५३ टीएमसी साठा वाढला. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास ७२.८९ टीएमसी साठा झाला होता. पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी शुक्रवारी सकाळपासून कोयनेच्या दरवाजातूनही १० हजार क्यूसेकने पाणी सोडण्यात येणार आहे.
सांगली जिल्ह्यातील पूल, बंधारे पाण्याखाली
सांगली : पावसाच्या जोरदार सरींनी सांगली जिल्ह्याला झोडपले असून, नद्यांच्या पाणीपातळीत गतीने वाढ होत आहे. वारणा नदीवरील काही बंधारे, पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. वारणा नदीवरील मांगले-कांदे पूल, ऐतवडे खुर्द-निलेवाडी पूल आणि कणेगाव ते भरतवाडी रस्ता पाण्याखाली गेला आहे. कृष्णा नदीवरील पलूस तालुक्यातील नागठाणे बंधाराही पाण्याखाली गेला आहे.
चौकट
चांदोली धरणाचे दोन दरवाजे खुले
चांदोली धरण परिसरात गेल्या २४ तासांत १८५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पाणलोट क्षेत्रातून सध्या ३० हजार क्यूसेक आवक होत आहे. त्यामुळे चोवीस तासांत दोन टीएमसीने धरणातील पाणीसाठा वाढला आहे. धरणाचे दोन वक्राकार दरवाजे खुले करून सहा हजार क्यूसेक विसर्ग वारणा नदीच्या पात्रात सुरू आहे. वारणा नदीच्या पुराने रौद्ररूप धारण केले आहे.