माढा लोकसभा मतदारसंघ: नाही गद्दारी, फुंकायची तुतारी; मोहिते-पाटील-निंबाळकरांचं ठरलं
By पोपट केशव पवार | Published: March 18, 2024 12:30 PM2024-03-18T12:30:44+5:302024-03-18T12:31:20+5:30
सांगोल्याचे अनिकेत देशमुखही चर्चेत
पोपट पवार
कोल्हापूर : माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मागूनही डावलल्याने भाजपवर नाराज असलेले अकलूजचे धैर्यशील मोहिते-पाटील व फलटणचे संजीवराजे नाईक-निंबाळकर या दोघांनीही माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची तुतारी हातात घेण्याचा अंतिम निर्णय रविवारी घेतला असल्याचे समजते.
महाविकास आघाडीकडून उमेदवारी कोणालाही मिळो, प्रामाणिकपणे एकमेकांना साथ द्यायची, असा शब्द या दोन्ही परिवारांनी एकमेकांना दिला आहे. त्यामुळे 'माढा' मतदारसंघातून शरद पवार यांचे पूर्वाश्रमीचे सवंगडीच भाजपला चीतपट करण्यासाठी मैदानात उतरणार आहेत, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. अकलूजमधील शिवरत्न बझार येथे रविवारी मोहिते-पाटील व नाईक-निंबाळकर बंधूंची बैठक पार पडली. विशेष म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील व पुरोगामी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांनीही या बैठकीला उपस्थिती दर्शवीत 'माढा' शेकापला सोडण्याची मागणी केली.
भाजपने उमेदवारी नाकारल्याने बंडाच्या पवित्र्यात असलेल्या धैर्यशील मोहिते-पाटील यांनी महाविकास आघाडीकडून लढावे यासाठी कार्यकर्त्यांचा दबाव वाढला आहे. त्यातच रामराजे नाईक-निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे नाईक-निंबाळकर यांचेही नाव 'महाविकास'कडून पुढे आणले जात आहे. या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली. आता माघार नाही असे सांगत धैर्यशील मोहिते व संजीवराजे या दोघांनीही निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त करत भाजपला आव्हान देण्याची तयारी दर्शविल्याचे समजते.
धैर्यशील मोहिते-पाटील यांनी 'धाडस' दाखवत 'तुतारी' हातात घेतली तर त्यांना मनापासून साथ देऊ असा शब्द नाईक -निंबाळकर बंधूंनी दिला, तर 'माढा'च्या मैदानात संजीवराजे उतरले तर त्यांना त्याच ताकतीने मताधिक्य देण्याची ग्वाही मोहिते-पाटील परिवाराने दिली. इच्छुक धैर्यशील माेहिते व संजीवराजे या दोघांचीही नावे शरद पवार यांच्याकडे पाठवण्यात आली असून, दोन दिवसांत यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.
सांगोल्याचे अनिकेत देशमुखही चर्चेत
माजी मंत्री स्व. गणतपराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांचेही नाव या मतदारसंघातून चर्चिले जात आहे. आमदार जयंत पाटील यांनी तशी जाहीर मागणी केली होती. या बैठकीत अनिकेत देशमुख यांच्याही नावाबाबत चर्चा झाली असून, त्यांचे नाव शरद पवार यांच्याकडे पाठवण्यात आले आहे.