ढेरे यांच्या अशासकीय सदस्य नियुक्ती अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:24 AM2021-03-10T04:24:27+5:302021-03-10T04:24:27+5:30
(बाजार समिती लोगो) लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या अशासकीय मंडळ सदस्यपदी मारुती श्यामू ढेरे ...
(बाजार समिती लोगो)
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या अशासकीय मंडळ सदस्यपदी मारुती श्यामू ढेरे (वरणगे) यांची नियुक्ती करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. मात्र सहा वर्षांपूर्वी ढेरे यांच्यावर सहकार विभागाने समितीचे नुकसान केल्याप्रकरणी सव्वा लाखाची जबाबदारी निश्चित केली होती. अद्याप त्यांनी भरली नसल्याने त्यांची ही नियुक्ती अडचणीत आली आहे.
बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत संपल्याने राज्य शासनाने समितीवर सप्टेंबर महिन्यात माजी आमदार के. पी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली अशासकीय मंडळ नियुक्त केले. गेली सहा महिने हे मंडळ कार्यरत असून, २४ फेब्रुवारी रोजी अशासकीय मंडळात मारुती ढेरे यांचा समावेश करावा, असा आदेश राज्य शासनाने दिला आहे. मात्र समावेश करत असताना संबंधित व्यक्ती सदस्य म्हणून पात्र आहे का? याची चौकशी करण्याची सूचना जिल्हा उपनिबंधकांनी दिली आहे. जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समितीकडे अभिप्राय मागितला आहे.
मारुती ढेेरे हे समितीच्या २०१०-२०१५ या संचालक मंडळात होते. भूखंड वाटपासह इतर अनियमित कामकाज केल्याप्रकरणी पणन विभागाने संचालक मंडळ बरखास्त करून चौकशी लावली होती. यामध्ये संचालक व सचिवांवर सुमारे २२ लाखांची जबाबदारी निश्चित केली होती. प्रत्येक संचालकावर १ लाख २५ हजार रुपयांची जबाबदारी निश्चित करत ते भरण्याचे आदेश ‘पणन’ने दिले होते. संचालकांनी पैसे न भरल्याने महसुली कारवाई सुरू केली. त्यातील दोन संचालकांनी पैसे भरले आहेत. पैस न भरणाऱ्यांच्या मालमत्तांवर बोजा चढविण्याचे काम सुरू आहे. ढेरे यांच्यावर सव्वा लाख मुद्दल व १५ टक्केप्रमाणे व्याज अशी सव्वा दोन लाख रुपयांची जबाबदारीची रक्कम होऊ शकते. त्यामुळे त्यांचा समावेश करून घेण्यात अडचणी आहेत.
कोट-
मारुती ढेरे यांच्या नियुक्तीबाबत समितीकडे अभिप्राय मागितला आहे. त्यानुसार राज्य शासनास कळविले जाईल.
- अमर शिंदे, जिल्हा उपनिंबधक, कोल्हापूर