कोल्हापूर, सांगलीच्या कुटुंबांना धम्मदीक्षा
By admin | Published: January 30, 2017 01:01 AM2017-01-30T01:01:36+5:302017-01-30T01:01:36+5:30
धम्म परिषद : पाच वर्षांत एक कोटी धम्म उपासक करण्याचा निर्धार : सुशीलकुमार कोल्हटकर
कोल्हापूर : धम्मदेसना, दीक्षा, प्रबोधनपर शाहिरी कार्यक्रम, व्याख्यान अशा विविध उपक्रमांनी रविवारी बौद्ध प्रणाली चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित दुसरा धम्म दीक्षा सोहळा आणि धम्म परिषद पार पडली. यात कोल्हापूर, सांगलीमधील ५० कुटुंबांनी धम्मदीक्षा घेतली.
येथील दसरा चौकात सकाळी या सोहळ्याचे उद्घाटन भन्ते यश काश्यपायन महाथेरो (जयसिंगपूर), आर. आनंद (हुपरी), एस. संबोधी (आजरा), काश्यप (पुणे), धम्मसेना (आसाम), आनंद सुमनगिरी (सांगोला), विमलकीर्ती (जत) यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी आर्या काळे हिने आम्रपाली नृत्य सादर केले. यानंतर कोल्हापूर, सांगलीमधील ५० कुुटुंबांतील २५० जणांना भन्ते यश काश्यपायन महाथेरो यांनी धम्मदीक्षा दिली.
यावेळी भन्ते एस. संबोधी म्हणाले, बौद्ध धम्म मानवमुक्तीसाठी आहे. जातिपातींऐवजी कर्मावर विश्वास ठेवा. कर्मच तुम्हाला तारणार आहे. भन्ते यश काश्यपायन महाथेरो म्हणाले, जातिव्यवस्थेतून बाहेर पडल्याशिवाय मुक्त श्वास घेता येत नाही. त्यासाठी बौद्ध धम्माचा स्वीकार करा. कार्यक्रमात ट्रस्टचे अध्यक्ष सुशीलकुमार कोल्हटकर यांनी प्रास्ताविक केले. यात त्यांनी ट्रस्टच्या कार्याची माहिती दिली. येत्या पाच वर्षांत एक कोटी धम्म उपासक करण्यात येतील. त्यासाठी राष्ट्रीय बुद्ध अभियान राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तकदीर कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.
स्वागताध्यक्ष बाळासाहेब भोसले, ट्रस्टचे सचिव सुबोधकुमार कोल्हटकर, व्यंकाप्पा भोसले, भरत रसाळे, अनिल म्हमाणे, सुभाष देसाई, आदी उपस्थित होते. सोहळ्यास कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, बेळगाव परिसरातील धम्म उपासक उपस्थित होते. परिषदेत
प्रा. डॉ. शरद गायकवाड यांचे ‘मानवमुक्तीचा मार्ग - बौद्ध धम्म’ या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी प्राचार्य डॉ. अच्युत माने, एस. पी. कांबळे, अमर कांबळे, आदी उपस्थित होते. दुपारी विद्रोही शाहीर रणजित कांबळे यांचा आणि सायंकाळी ‘आवाज भीमाचा’ हा कार्यक्रम झाला.