धोबी तलाव, एसटीपी प्लान्ट, क्लस्टर पंचगंगा नदी प्रदुषणमुक्तीचा आराखडा : महिन्याभरात सुक्ष्म नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:13 AM2021-01-08T05:13:52+5:302021-01-08T05:13:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी मांडण्यात आलेल्या २२० कोटींच्या आराखड्यात कपडे धुण्यासाठी धोबी घाट, जनावरांसाठी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी मांडण्यात आलेल्या २२० कोटींच्या आराखड्यात कपडे धुण्यासाठी धोबी घाट, जनावरांसाठी स्वतंत्र व्यवस्था, विसर्जन कुंड यासह इचलकरंजीतील सांडपाणी, औद्योगिक वसाहतीतील पाण्यावर प्रक्रिया, गावांना जलशुद्धीकरणासाठी निधी अशा वेगवेगळ्या बाबींचा समावेश आहे. या आराखड्याचे सूक्ष्म नियोजन करुन त्याचा प्रस्ताव महिन्याभरात राज्य शासनाला सादर करण्यात येणार आहे.
पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठीचा २२० कोटींचा आराखडा सादर केला. यानुसार कोल्हापूर महापालिका, इचलकरंजी नगरपालिका, औद्योगिक वसाहती, जिल्हा परिषद, जलसंपदा अशा वेगवेगळ्या घटकांच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या असून, त्यांनी आपल्या पातळीवर प्रदूषण रोखण्यासाठीचा सूक्ष्म आराखडा तयार करावयाचा आहे. मंगळवारी सादर झालेला आराखडा हा ढोबळ असून, त्याचे सूक्ष्म नियोजन करून निधीसाठी राज्य शासनाकडे प्रस्तावित करावयाचा आहे.
-
धोबी तलाव, विसर्जन कुंड, जनावरांची स्वतंत्र सोय : महापालिका
कपडे धुण्यासाठी धोबी तलाव, जनावरे धुण्यासाठी स्वतंत्र सोय, गणेशमूर्ती विसर्जनासाठी विसर्जन कुंड महापालिकेने प्रस्तावित केले आहे. भविष्यातील नियोजन म्हणून १० एमएलडीचा एसटीपी प्लान्ट प्रस्तावित केला आहे. सध्या महापालिका क्षेत्रातील ९६ पैकी ९१ एमएलडी सांडपाण्यावर शुद्धतेची प्रक्रिया करून ते पुन्हा नदीत सोडले जाते. उर्वरित ४ व ६ एमएलडी एसटीपीचे काम सध्या सुरू आहे. १२ पैकी ७ नाले एसटीपीला जोडले असून, उर्वरित ५ नाल्यांचे काम सुरू आहे.
---
पंचगंगा नदीच्या परिघातील नगरपालिका, औद्योगिक स्थिती अशी
कोल्हापूर महापालिका, इचलकरंजी नगरपालिका, कुरुंदवाड, शिरोळ, हुपरी-पन्हाळा नगरपालिका
१७४ गावे (७ तालुके), ८ साखर कारखाने, ५ आसवन्या, ३ औद्योगिक वसाहती, ३ सहकारी औद्योगिक वसाहती, ३ अन्य औद्योगिक वसाहती,
३ हजार ५०० उद्योगांपैकी १०५ पाणी वापर करणारे मोठे उद्योग.
--
४०० उद्योगांवर नियंत्रण नाही...
इचलकरंजीतील घरगुती सांडपाण्याचे प्रमाण ३८ एमएलडी असून, २० एमएलडीवर प्रक्रिया केली जाते. उर्वरित १८ एमएलडी पाणी विनाप्रक्रिया नदीत मिसळते. येथे घरोघरी उद्योग केले जातात व हे पाणी नाल्याद्वारे नदीत मिसळते. हे पाणी साठविण्यासाठी टँकर पुरविण्याचे नियोजन आहे. हे पाणी लिफ्ट करून सायझिंग (२५० युनिट) च्या पाण्यापासून बायोगॅस निर्मिती व रंगारी (१५० युनिट)च्या पाण्यावर सामूहिक सांडपाणी प्रक्रिया करण्यात येणार आहे.
--
इचलकरंजी नगपालिका
सध्याचे २० एमएलडी सांडपाणी प्रक्रिया केंद्र अद्ययावत करणे, २० एमएलडी क्षमतेचे नवे केंद्र उभारणे, ५ नाले वळवणे, जवळच्या गावांतील सांडपाण्याचे व्यवस्थापन, ६८ टेक्स्टाईलसाठी सीएईटीपी, घनकचरा व भूमिगत गटारे असे इचलकरंजी नगरपालिकेचे नियोजन आहे.
--
३९ गावांचे पाणी थेट नदीत
जिल्हा परिषदेंतर्गत येणाऱ्या १७४ गावांपैकी नदीजवळच्या ३९ गावांचे सांडपाणी थेट नदीत मिसळते. त्यात ११ गावे मोठी आहेत. यापैकी दोन-दोन गावांचे एक क्लस्टर करून प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्यांना दीड कोटींचे बिनव्याजी कर्ज व सविस्तर प्रोजेक्ट रिपोर्टसाठी २ लाख रुपये दिले आहे.
--
औद्योगिक
पंचतारांकित एमआयडीसी : ६ उद्योग
गोकुळ शिरगाव : ५ उद्योग
शिरोली : ४ उद्योग, येथील नागरी सांडपाण्यावर प्रक्रिया होत नाही.
सहकारी, साखर : सांडपाणी व घनकचरा प्रक्रिया व पुनर्वापर बंधनकारक
--