मध्यवर्ती बसस्थानकासमोर ‘ढोल बजाव’ आंदोलन
By admin | Published: August 14, 2015 11:46 PM2015-08-14T23:46:10+5:302015-08-14T23:46:10+5:30
एस. टी. वर्कर्स काँग्रेसतर्फे निदर्शने : विविध मागण्यांकडे वेधले लक्ष
कोल्हापूर : वीज वितरण कंपनीप्रमाणे २५ टक्के पगारवाढ द्यावी, यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स काँग्रेसतर्फे (इंटक) मध्यवर्ती बसस्थानकासमोर दुपारी दीड ते दोन या वेळेत ‘ढोल बजाव’ आंदोलन करण्यात आले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी जोरदार निदर्शने करून आंदोलनाकडे लक्ष वेधले. राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कामगारांच्या पगारवाढीच्या करारात अनेक त्रुटी आहेत. परिणामी कामगारांचे प्रचंड नुकसान होत आहे. परिणामी कामगारात असंतोष निर्माण झाला आहे. ‘औद्योगिक कलह अधिनियम १९४७’ मधील तरतुदीनुसार कामगार करार रद्द करण्यात यावा, पगारवाढ करावी, पात्र कर्मचाऱ्यांना नियमित वेतन निश्चित करण्यात यावी, तेरा टक्क्यांचा फायदा देऊन वेतन निश्चिती करण्यात यावी, चालक, वाहक यांचे ड्युटी अलोकेशन संगणकीकृत करून ‘टी-९’ रोटेशनची अंमलबजावणी करण्यात यावी, सर्व कर्मचाऱ्यांना संगणकीयकृत रजा व्यवस्थापन लागू करण्यात यावी, वेतनश्रेणी निश्चितीमधील त्रुटी दूर कराव्यात, महिला कर्मचाऱ्यांना कायद्यानुसार मिळणाऱ्या विविध सोयी-सवलती देण्यात याव्यात, शिकाऊ उमेदवारांना विद्यावेतन त्वरीत द्यावे मागण्यांकडे ढोल वाजवून लक्ष वेधले. मागण्यांच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी राज्याचे उपाध्यक्ष बंडोपंत वाडकर, विभागीय अध्यक्ष आनंदा दोपाडे, महिला आघाडीच्या सारिका शिंदे, सुनंदा ओहोळ, सयाजीराव घोरपडे, विजय हवालदार, मधुकर पाटील, सुरेश गवळी, आप्पासाहेब साळोखे, बळिराम पाटील, शहाजी मडके, प्रसाद कोळी, श्रीकृष्ण खामकर, आदी पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. ( प्रतिनिधी )