कोल्हापूरात गुढीपाडव्यादिवशी ढोल-ताशा वाद्य स्पर्धा
By admin | Published: March 13, 2017 02:53 PM2017-03-13T14:53:04+5:302017-03-13T14:53:04+5:30
खासबाग मैदानात स्पर्धा : विजेत्या पथकास लाखाचे बक्षीस
कोल्हापूरात गुढीपाडव्यादिवशी ढोल-ताशा वाद्य स्पर्धा
खासबाग मैदानात स्पर्धा : विजेत्या पथकास लाखाचे बक्षीस
कोल्हापूर : डॉल्बीसारख्या कानठाळ्या बसणाऱ्या वाद्याला फाटा देत पारंपारिक वाद्याला उभारी देण्याच्या उद्देशाने गुढीपाडव्या दिवशी म्हणजेच २८ मार्च रोजी पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच ‘वाजवेल तो गाजवेल’ या ढोल-ताशा वादनाच्या स्पर्धाचे आयोजन केले आहे.
चैत्राची सुरुवात ही गुढीपाडव्याने होते. साडेतीन मूहुर्तापैकी एक असा हा शुभ मुहूर्त मानला जात आहे. या मंगलमय दिवसाचे स्वागत करुन हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी युवासेना, कोल्हापूरच्यावतीने येथील छ. शाहू खासबाग मैदानावर दुपारी ४ ते रात्री १० या वेळेत या ढोल-ताशे वादनाच्या स्पर्धा होणार आहे. या स्पर्धा कोल्हापूर जिल्हा मर्यादित असून स्पर्धेतील विजेतच्या ढोल-ताशा पथकास १ लाख रुपये तर उत्कृष्ट ध्वजसंचलनास दहा हजार रुपये यासह आकर्षक बक्षिसेही देण्यात येणार आहेत. शिवाय सहभागी पथकांना ट्रॉफीज देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी मराठी सिने सृष्टीतील सेलीब्रीटीचे खास आकर्षण राहणार आहेत.
डॉल्बीसारख्या कानठाळ्या बसणाऱ्या वाद्याला फाटा देत महाराष्ट्रीयन पारंपारिक वाद्यांकडे आजच्या युवा पिढीने वळावे यासाठीह या स्पर्धाचे आयोजन केले आहे. स्थानिक ढोल-ताशा पथके सबल व्हावीत हाही स्पर्धेचा उद्देश आहे. स्पर्धेत एकूण १५ पथके सहभागी होणार आहेत. प्रत्येक पथकात ४० वादकांचा मर्यादीत समावेश बंधनकारक आहे. प्रत्येक पथकाला किमान २० मिनीटांचा कालावधी कौशल्ये दाखविण्यासाठी देण्यात आलेला आहे. याशिवाय पुण्यातील पंचाकडून या स्पर्धकांचे मुल्यमापन होणार आहे. (प्रतिनिधी)