थकबाकीदारांच्या दारात पावसाळ्यानंतर ढोलताशा, कोल्हापूर जिल्हा बँकेचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 01:11 PM2018-07-24T13:11:41+5:302018-07-24T13:33:48+5:30
कोल्हापूर जिल्हा बॅँकेच्या दहा बड्या थकबाकीदारांच्या दारात पावसाळ्यानंतर ढोलताशा घेऊन जाण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. संबंधित थकबाकीदारांची नावे वर्तमानपत्रांसह डिजीटल फलकांच्या माध्यमातून प्रसिद्ध करून त्यांची मालमत्ता लिलावात काढण्याची प्रक्रियाही सुरू केली जाणार आहे.
कोल्हापूर : जिल्हा बॅँकेच्या दहा बड्या थकबाकीदारांच्या दारात पावसाळ्यानंतर ढोलताशा घेऊन जाण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. संबंधित थकबाकीदारांची नावे वर्तमानपत्रांसह डिजीटल फलकांच्या माध्यमातून प्रसिद्ध करून त्यांची मालमत्ता लिलावात काढण्याची प्रक्रियाही सुरू केली जाणार आहे.
जिल्हा बॅँकेच्या औद्योगिक कर्ज व ग्रामीण कारागरी योजना समितीची बैठक झाली, यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ होते.
बँकेची सन २०१७-१८ ची वसुली उत्कृष्ट असतानाही दहा बड्या थकबाकीदार संस्थांनी मात्र बँकेला वसुलीच्या कामात सहकार्य केले नाही; त्यामुळे बॅँकेने आक्रमक भूमिका घेतली असून आता गांधीगिरी मार्गाने दारात ढोलताशे वाजवून थकबाकी भरण्याचे आवाहन करायचे, त्याला प्रतिसाद दिला नाहीतर मालमत्ता विक्रीची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय बैठकीत झाला. इतर थकबाकीदार संस्थांकडेही वसुलीची अशीच प्रक्रिया राबविली जाणार आहे.
टॉपटेन थकबाकीदार -
शेतकरी तंबाखू खरेदी-विक्री संघ, राधानगरी तालुका मका प्रक्रिया (स्टार्च) संस्था, ठिकपुर्ली, विजयमाला देसाई वाहतूक संस्था, मडिलगे ब्रुद्रुक, शेतीमाल प्रक्रिया संस्था हेरवाड, भोगावती शेतकरी कुक्कुटपालन संस्था परिते, हिरण्यकेशी शेतीमाल प्रक्रिया संस्था निलजी, महाराष्ट्र स्टेट को-आॅप. टोबॅको फेडरेशन मार्केट यार्ड कोल्हापूर, मयूर वाहतूक संघ कोल्हापूर, पंत वस्त्रोद्योग प्रोसेस संस्था तिळवणी, एस. के. पाटील बॅँक कुरुंदवाड.
अशी राबवणार वसुलीची प्रक्रिया -
पहिल्या टप्प्यात थकबाकीदारांची यादी प्रसिद्ध केली जाणार, डिजीटल फलक लावणार, दुसऱ्या टप्प्यात थकबाकीदार संस्था संचालकांची नावे प्रसिद्ध करणार, संस्था पदाधिकाऱ्यांच्या दारात ढोल-ताशांचा गजर, शेवटच्या टप्प्यात मालमत्ता लिलावात काढणार.