जेजुरीतील धुडगूस भाजपच्या इशाऱ्यावरूनच : विक्रम ढोणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:22 AM2021-02-15T04:22:18+5:302021-02-15T04:22:18+5:30
कोल्हापूर : जेजुरीच्या खंडोबा गडावरील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या ठिकाणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी घातलेला धुडगूस ...
कोल्हापूर : जेजुरीच्या खंडोबा गडावरील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या ठिकाणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी घातलेला धुडगूस आणि त्यानंतर भाजप नेते भूषणसिंह होळकर यांनी घेतलेली भूमिका हा भाजपने रचलेल्या षड्यंत्राचा भाग आहे. पडळकर आणि होळकर यांचे धनगर समाजाच्या चळवळीसाठी काडीचेही योगदान नाही. मात्र धनगर समाजाचे आयते नेतृत्व मिळावे म्हणून धडपड सुरू असल्याची टीका धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी केली आहे.
ढोणे म्हणाले, जेजुरी येथील पुतळा अनावरणाचा समारंभ हा महाराष्ट्रासाठी गौरवाचा क्षण होता. जेजुरी आणि होळकर घराणे हे अतूट नाते आहे. अहिल्यादेवींनी जेजुरीच्या विकासात अनमोल असे योगदान दिलेले आहे. त्यामुळे गडावर अहिल्यादेवींचा पुतळा उभारावा, अशी मागणी तीन वर्षांपूर्वी होळकरप्रेमींनी देव देवस्थान ट्रस्टकडे केली होती. पुतळ्याच्या अनावरणास ज्येष्ठ नेते शरद पवार, होळकर राजघराण्याचे युवराज यशवंतराव होळकर व करवीर घराण्याचे खासदार संभाजीराजे यांना निमंत्रित केले होते. पण तत्पूर्वीच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुतळास्थळी येऊन हुल्लडबाजी केली. शरद पवार यांच्याहस्ते अनावरणाला विरोध असल्याचे सांगत पुतळ्याच्या ठिकाणी हाणामारी केली. कार्यकर्त्यांना पुतळ्याच्या तिथे वर चढवून ओढाओढी केली. हा प्रकार पुतळ्याची विटंबना करण्याचा होता. त्यांनी नियोजनबद्धरित्या पुतळा अनावरण समारंभाला गालबोट लावले. पुतळ्याचे अनावरण कुणाच्याहस्ते घ्यावे, कधी घ्यावे हा ट्रस्टचा विषय असताना, पडळकरांनी भाजपच्या इशाऱ्यावरून काळिमा लावणारे कृत्य केले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रेमासाठी त्यांनी अहिल्यादेवींच्या नावाने होणाऱ्या कार्यक्रमाची विटंबना केली आहे. भूषणसिंह यांना भाजपकडून आमदार, खासदारकी मिळवायची असल्याचा आरोपही ढोणे यांनी केला.