‘कुंभी-कासारी’साठी आता धुमशान
By admin | Published: October 28, 2014 10:30 PM2014-10-28T22:30:12+5:302014-10-29T00:15:07+5:30
डिसेंबर-जानेवारीमध्ये निवडणुका : संचालकांची संख्या चारने कमी होणार असल्याने नेत्यांची होणार गोची
प्रकाश पाटील - कोपार्डे -कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत २० डिसेंबर २०१४ मध्ये संपत असून, नवीन संचालक मंडळासाठी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अथवा जानेवारी २०१५ मध्ये निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे. त्याबाबत हालचाली सुरू असून, २१ जणांचे संचालक मंडळ ९७ व्या घटना दुरुस्तीनुसार अस्तित्वात येणार आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये जी ईर्षा दिसून आली, तशीच ईर्षा
कुंभी-कासारीच्या निवडणुकीत दिसणार असून, एकास एक लढत आमदार चंद्रदीप नरके यांना देण्यासाठी विरोधकांकडून नियोजन सुरू आहे.
विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ‘कुंभी’चे अध्यक्ष आमदार चंद्रदीप नरके यांच्या विरोधात विरोधी शाहू आघाडीचे सर्व नेते पी. एन. पाटील यांच्या बाजूने जोमात कामाला लागले आहेत. ‘कुंभी’च्या २०१४ ते २०१९ या पंचवार्षिक निवडणुकीचा मोठा संदर्भ या नेत्यांच्या एकत्र येण्यामागे होता, हे स्पष्ट चित्र विधानसभेच्या प्रचारसभेतही दिसत होते. निवडणूक विधानसभेची, मात्र सभेत आरोप-प्रत्यारोप ‘कुंभी’च्या कारभारावरून सुरू व्हायचे. यामुळे निवडणूक विधानसभेची की कुंभी-कासारी कारखान्याची, असा संभ्रम निर्माण होत होता. मात्र, आमदार आपला असेल, तर कुंभी-कासारीच्या २०१४-१९ च्या पंचवार्षिकचे मिशन यशस्वी करण्यात कोणतीच अडचण येणार नाही, हा विश्वास विरोधी नेत्यांमध्ये होता.
विधानसभेत अपयश आले असले तरी नरके यांना मिळालेल्या यशाने विरोधकांत जोश आला असून, पूर्ण ताकदीचे उमेदवार देण्यासाठी विरोधकांतून चाचपणी चालली आहे.
विधानसभेत मिळालेल्या विजयाने अध्यक्ष आमदार चंद्रदीप नरके यांच्या गोटात चैतन्य आहे.
कुंभी-कासारी कारखाना चालवावा, तर तो नरके घराण्याने ही येथील सभासदांची मानसिकता कॅश करण्याचे कसब नरके घराण्याकडे असल्याने उमेदवारीसाठी नरके पॅनेलमध्ये स्थान मिळावे, यासाठी अनेकांनी आतापासूनच देव पाण्यात ठेवण्यास सुरुवात केली आहे. ९७ व्या घटना दुरुस्तीनुसार संचालकांची संख्या चारने घटली असून, यात संस्था प्रतिनिधी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व सर्वसाधारण गटातील दोन असे चार प्रतिनिधी कमी होणार आहेत.
एकूण मतदान : २३ हजार ७०७
कुंभी-कासारीचे
कार्यक्षेत्र : १७९ गावे
करवीर : १४ हजार ४९
पन्हाळा : ७ हजार ६५७
शाहूवाडी : ५६१
राधानगरी : ७१०
गगनबावडा : ७३०
असे असेल संचालक मंडळ
सर्वसाधारण गट : १६
महिला गट : ०२
मागासवर्गीय गट : ०१
इतर मागास गट : ०१
भटकी जमात : ०१
एकूण संचालक : २१
२१ हजार मतदान
करवीर, पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, गगनबावडा अशा पाच तालुक्यांत कार्यक्षेत्र येते. यात करवीरमध्ये १४ हजार ४९ व पन्हाळ्यात ७ हजार ६५० असे २१ हजार ७०६ सर्वाधिक मतदान आहे. यात मागील पंचवार्षिक निवडणुकीत विरोधी शाहू आघाडीला करवीरमधून प्रत्येक उमेदवाराला किमान एक हजार ते १५०० मतांचे मताधिक्य होते; पण पन्हाळ्यात मतमोजणी जाताच हे मताधिक्य कमी होत आमदार नरके यांच्या पॅनेलच्या सर्वसाधारण गटातील सर्व उमेदवारांनी एक हजार ते दोन हजारांच्या मताधिक्याने विजय मिळविला. फक्त संस्था गटातील विरोधी शाहू आघाडीच्या पी. जी. शिंदे यांना यश मिळाले.