मंदिर जीर्णाेद्धाराच्या पैशांवरून धुमश्चक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2015 01:01 AM2015-05-26T01:01:32+5:302015-05-26T01:02:57+5:30
वारूंजीत तिघे जखमी : परस्परविरोधी फिर्यादींवरून माजी सरपंचांसह तेराजणांवर गुन्हा
कऱ्हाड : मंदिराच्या जीर्णाेद्धारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत माजी सरपंचाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना वारूंजी (ता. कऱ्हाड) येथे सोमवारी दुपारी घडली. यावेळी झालेल्या धुमश्चक्रीप्रकरणी कऱ्हाड शहर पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यावरून नऊजणांवर गुन्हा दाखल करण्यात आलक असून, चारजणांवर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कऱ्हाडनजीक वारूंजी गावात सोमवारी मारुती मंदिराच्या जीर्णाेद्धाराबाबत चर्चा करण्यासाठी सभा बोलविण्यात आली होती. या सभेत वाद होऊन मारामारी झाली. जमावाने माजी सरपंच नामदेव पाटील यांना मारहाण केल्याचा आरोप आहे, तर नामदेव पाटील यांच्या गटाने केलेल्या मारहाणीत तिघे जखमी झाल्याचे दुसऱ्या गटाचे म्हणणे आहे. याबाबत नामदेव काशीनाथ पाटील (वय ४३, रा. वारुंजी, ता. कऱ्हाड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इंद्रजित अरुण पाटील, भास्कर बाळकृष्ण पाटील, चंद्रकांत दाजी पाटील, विशाल चंद्रकांत पाटील, प्रवीण सदाशिव पाटील, दिलीप रामचंद्र पाटील, विकास श्रीरंग पाटील, सचिन भास्कर पाटील (सर्व रा. वारूंजी) यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. प्रशांत भीमराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माजी सरपंच नामदेव काशीनाथ पाटील, बाळासाहेब काशीनाथ पाटील, मुकुंद काशीनाथ पाटील, नयन बाळासाहेब पाटील यांच्यावर अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
नामदेव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मंदिराच्या बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याकरिता ४ लाख ३० हजार रुपये खर्च केले होते. ते पैसे त्यांना २० मे २०१५ रोजी परत मिळाले होते. उर्वरित कामावर चर्चा करण्यासाठी सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयात बैठक बोलावली होती. चर्चा सुरू असताना इंद्रजित अरुण पाटील याने नामदेव पाटील यांना ‘तुम्ही आमच्या घरातील व्यक्तीबाबत उलटसुलट का बोलला,’ अशी विचारणा केली. त्याने नामदेव पाटील यांचा हात धरून बाहेर आणले. त्यानंतर त्याच्यासह इतरांनी नामदेव पाटील यांना मारहाण केली. याउलट प्रशांत भीमराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,ग्रामपंचायत कार्यालयात मंदिर बांधकामाची चर्चा सुरू असताना नामदेव पाटील यांच्यासह इतरांनी धक्काबुक्की करून शिवीगाळ केली.
या मारहाणीत भास्कर पाटील व चंद्रकांत पाटील हे जखमी झाले. याबाबतची नोंद कऱ्हाड
शहर पोलिसांत झाली असून,
दोन्ही गटांतील आरोपींची पोलिसांकडून धरपकड सुरू
आहे. (प्रतिनिधी)