राज्यात धुवादार...कोल्हापुरात प्रतीक्षाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:49 AM2021-09-02T04:49:30+5:302021-09-02T04:49:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : गेल्या दोन दिवसांपासून राज्यात धुवादार पाऊस सुरू असल्याने अनेक नद्यांना महापूर आला आहे. मात्र, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : गेल्या दोन दिवसांपासून राज्यात धुवादार पाऊस सुरू असल्याने अनेक नद्यांना महापूर आला आहे. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षाच आहे. दोन दिवसांपासून पावसाळी वातावरण झाले असले तरी पाऊस नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. हातातोंडाला आलेले खरीप पिके जातात की काय? अशी भीती शेतकऱ्यांना आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात वीस-बावीस दिवस झाले, पावसाने दडी मारली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून काही ठिकाणी पाऊस झाला असला तरी अनेक ठिकाणी अजून प्रतीक्षाच आहे. मंगळवारपासून राज्यात पुन्हा माॅन्सून सक्रिय होईल, असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला होता. त्यानुसार राज्यात अनेक जिल्ह्यांत धुवादार पाऊस कोसळत आहे. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यात अद्याप प्रतीक्षाच आहे. मंगळवारी सकाळी पावसाची भुरभुर सुरू झाल्याने दिवसभरात जोरदार सुरुवात करेल, असा अंदाज होता; मात्र नुसतेच ढगाळ वातावरण राहिले. या उलट अनेक जिल्ह्यांत जोरदार पावसाने महापूर आला आहे. येथील शेतकऱ्यांना अद्याप पावसाची प्रतीक्षाच आहे. बुधवारी सकाळी ऊन पडले होते, त्यानंतर ढगाळ वातावरण राहिले, दुपारी दोन वाजल्यापासून कोल्हापूर शहरात पावसाची भुरभुर सुरू राहिले.
सध्या खरीप पिकांना पावसाची गरज आहे. पाण्याअभावी पिकांची वाढ खुंटली आहे.