मेंदू विकार गाठीचे निदान अवघा दोन दिवसांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:49 AM2020-12-05T04:49:14+5:302020-12-05T04:49:14+5:30
कोल्हापूर : मेंदू विकार-गाठी (न्युरोपॅथाॅलाॅजी) मध्ये कोल्हापूरच्या न्यू शाहूपुरीतील पॅथाॅलाॅजिस्ट डाॅ. मेघना विनय चौगुले यांनी महत्त्वपूर्ण संशोधन करून लिहिलेल्या ...
कोल्हापूर : मेंदू विकार-गाठी (न्युरोपॅथाॅलाॅजी) मध्ये कोल्हापूरच्या न्यू शाहूपुरीतील पॅथाॅलाॅजिस्ट डाॅ. मेघना विनय चौगुले यांनी महत्त्वपूर्ण संशोधन करून लिहिलेल्या न्युरोपॅथाॅलाॅजी ऑफ ब्रेन ट्युमर्स वूईथ रेडिओलाॅजिक कोरलेट्स पुस्तकाची आंतरराष्ट्रीय पातळीवर नोंद झाली आहे. आंतरराष्ट्रीय प्रकाश स्प्रिंगर प्रकाशनने जर्मनी येथे हे पुस्तक प्रकाशित केले आहे, अशी माहिती डाॅ. मेघना चाैगुले यांनी बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
या पुस्तकामध्ये मेंदूतील गाठीचे १२८ प्रकार व उपप्रकारांच्या नऊशे प्रतिमा आहे. रुग्णाला गाठीमध्ये होणारा त्रास व लक्षणे, एम.आर.आय, शस्त्रक्रिया सुरू असतानाची इन्ट्रोपरेटिव्ह सायटोलाॅजी, हिस्टोपॅथोलाॅजी, इमोन्यूहिस्टोकेमिस्ट्री व त्या रुग्णाच्या प्रोग्नेसिसचा समावेश आहे, ज्यामुळे गाठीचा प्रकार, उपप्रकार व त्याची ग्रेड समजून पुढील उपचाराची दिशा ठरवता येते. त्याचे अचूक प्रकारे निदान कसे करायचे याची मांडणी या पुस्तकात केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमाणानुसार सर्व गाठींचा यात समावेश आहे. या तपासण्यासाठी यापूर्वी मुंबई, बंगलोरला रुग्णाला जावे लागत होते. त्याचा अहवाल येण्यास १५ दिवस लागत होते. आता मात्र या सर्व तपासण्या कोल्हापुरात डाॅ. चौगुले यांच्या प्रयोगशाळेत होणार असून त्याचा अहवालही दोन ते तीन दिवसांत रुग्णांना मिळणार आहे. या पुस्तकाचा लाभ विकृतीशास्त्र, क्ष-किरण शास्त्र, मज्जासंस्था शल्यचिकित्सा शास्त्रचे विद्यार्थी, तज्ज्ञ डाॅक्टरांना होणार आहे. या पुस्तकाच्या रूपाने कोल्हापूरच्या वैद्यकीय क्षेत्राचा संपूर्ण जगभर बहुमान होत आहे. डाॅ. चौगुले यांनी या संशोधनासाठी सहा वर्षे खर्ची घातली आहेत. यावेळी डाॅ. शांतीकुमार चिवटे, डाॅ. प्रमोद पुरोहित, डाॅ. विनय चौगुले, डाॅ. संदीप चौगुले, आदी उपस्थित होते.
चौकट
शरीराचा राजा मेंदू
मेंदू हा कवटीच्या आतमध्ये असल्याने यातील शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीच्या असतात. मेंदू व मज्जातंतूच्या गाठीचे दोन महत्त्वाचे प्रकार आहेत. ते साधी गाठ, कर्करोगाची गाठ असे आहेत. अशा रुग्णांचे वारंवार बायप्सी घेणे शक्य नसते. त्यामुळे शस्त्रक्रिया सुरू असताना डाॅक्टरांना गाठीच्या प्रकाराबद्दल माहिती मिळाली तर त्याचा रुग्णाला फायदा होतो. तशी माहिती या पुस्तकात संशोधन रूपातून प्रसिद्ध केली आहे. अशा तपासणीची सोयही डाॅ. चौगुले यांनी कोल्हापुरात केली आहे.
फोटो : ०२१२२०२०-कोल-मेघना चौगुले