हिरण्यकेशीचे पात्र कोरडे
By admin | Published: January 30, 2017 11:49 PM2017-01-30T23:49:05+5:302017-01-30T23:49:05+5:30
शेतकरी चिंतेत : पाटबंधारे विभागाने खणदाळ बंधाऱ्याच्या पुढे पाणी सोडावे
हलकर्णी : नांगनूर, खणदाळ, अरळगुंडी, कडलगे दरम्यान हिरण्यकेशी नदीचे पात्र कोरडे पडले आहे. परिणामी. परिसरातील पिके वाळून जाण्याच्या भीतीने शेतकरी त्रस्त झाला आहे. पाटबंधारे विभागाने खणदाळ बंधाऱ्याच्या पुढे नांगनूर, अरळगुंडी, कडलगेपर्यंत पाणी सोडावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
यंदा चित्री प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. शिवाय यंदाचे वर्ष जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींचा रेटा पाटबंधारे विभागाला लागेल आणि मे अखेर लाभक्षेत्राबाहेरील गावांनाही पाणीपुरवठा होईल. या आशेवर शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, शाळू, भाजीपाला, आदी पिके घेतली. मात्र, सध्या पाण्याअभावी ही सर्व पिके वाळून जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
निवडणूक घोषित होण्यापूर्वी नांगनूर येथे झालेली हत्तरकी गटाची पाणी परिषद, लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा यामुळे महिन्यापूर्वी हिरण्यकेशी पात्रात कडलगेपर्यंत पाणी सोडले होते. मात्र, महाराष्ट्र, कर्नाटक हद्दीतील वाढलेले बागायती क्षेत्र, वाढता पाणी उपसा यांमुळे महिन्यातच नदीपात्र पुन्हा कोरडे पडले आहे. हत्तरकी गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रांताधिकाऱ्यांना नदीत पाणी सोडण्यासाठी निवेदन दिले आहे. मात्र, प्रशासनाने अद्याप त्याची दखल घेतली नाही.
चालूवर्षी परिसरात ऊस उत्पादनात प्रचंड घट आली होती. त्यामुळे चार पैसे मिळविण्याच्या उद्देशाने शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, शाळू या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केली होती. सध्या ही सर्व पिके भरणीच्या अवस्थेत आहेत. शिवाय ऊसपिकाला सुद्धा पाण्याची आवश्यकता आहे. वेळेत पाणी उपलब्ध झाले नाही, तर या सर्व पिकांच्या उत्पादनात घट होणार आहे.
पाटबंधारे विभागाने ताबडतोब पाणी सोडले नाही, तर नांगनूर, अरळगुंडी, कडलगे येथील तरुण शेतकरी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांवर बहिष्कार घालण्याची चर्चा करताना दिसत आहेत. पिके वाळून जाण्यापूर्वी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करून पाटबंधारे विभागास पाणी सोडण्यास भाग पाडावे, अशी या पंचक्रोशीतील शेतकऱ्यांची मागणी आहे. (वार्ताहर)