Gokul Election Result: गोकुळची निवडणूक झाल्यावर कोरोना आठवला का?, समाजमाध्यमातून नेत्यांवर जहरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 06:55 PM2021-05-04T18:55:30+5:302021-05-04T19:49:38+5:30
CoronaVirus Updates Kolhapur : गेले महिनाभर कोरोनाने जिल्ह्यात धुमाकुळ घातला असताना राजकारण्यांना गोकुळची निवडणूक महत्त्वाची होती, ती संपल्यावर यांना कोरोना आठवला का, जीवनावश्यक अशी गोकुळची निवडणूक झाल्यानंतर कोल्हापुरात कडक बंद, पीपीई कीट घालून मतदान होत असेल तर नागरिकांना कीट घालून व्यवसाय करू द्या., कोल्हापुरातील राजकारण्यांचा जाहीर निषेध, अशा शब्दांत राजकीय नेत्यांवर जहरी टीका करत कोल्हापूरकरांनी समाजमाध्यमांवर आपला संताप व्यक्त केला आहे.
इंदुमती गणेश
कोल्हापूर : गेले महिनाभर कोरोनाने जिल्ह्यात धुमाकुळ घातला असताना राजकारण्यांना 'गोकुळ'ची निवडणूक महत्त्वाची होती, ती संपल्यावर यांना कोरोना आठवला का, जीवनावश्यक अशी गोकुळची निवडणूक झाल्यानंतर कोल्हापुरात कडक बंद, पीपीई कीट घालून मतदान होत असेल तर नागरिकांना कीट घालून व्यवसाय करू द्या., कोल्हापुरातील राजकारण्यांचा जाहीर निषेध, अशा शब्दांत राजकीय नेत्यांवर जहरी टीका करत कोल्हापूरकरांनी समाजमाध्यमांवर आपला संताप व्यक्त केला आहे.
गेले महिनाभर जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप सुरू आहे. मात्र, त्या काळातही उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन ह्यगोकुळह्णची निवडणूक लढवली गेली. याकाळात तालुक्यांमध्ये प्रचार मेळावे घेतले गेले, त्यानिमित्ताने मोठ्या संख्येने नागरिक एकत्र येत होते, काही ठरावधारकांचा कोरोनाचे मृत्यूदेखील झाला.
हे सगळं सुरू असतानााही गोकुळची निवडणूक पुढे ढकलली गेली नाही. उलट कोरोनाच्या सगळ्या निर्बंधांना पायदळी तुडवत ही निवडणूक पार पाडली गेली आणि मंगळवारी मतमोजणी सुरू झाली की राजकीय नेत्यांनी तातडीची बैठक घेऊन जिल्ह्यात १० दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर केला. या प्रकारावर समाजमाध्यमांद्वारे नागरिकांनी संताप व्यक्त केला.
कोरोनाचा प्रकोप सुरू असताना राजकीय नेते व त्यांचे कार्यकर्ते गोकुळ निवडणुकीच्या राजकारणात मग्न होते. या लोकांनी स्वतःचे आर्थिक व राजकीय हित साधण्यासाठी कोल्हापूरच्या जनतेला वाऱ्यावर सोडले. रेमडेसिविर इंजेक्शन, कोरोना लस, ऑक्सिजन बेडची सोय याचा आढावा एकाही राजकारण्याने घेतला नाही. तुमच्या नादाला लागून कोणाचे हित झाले नाही म्हणून आम्ही प्रामाणिक प्रयत्न करून रोजीरोटी मिळविण्याचा प्रयत्न करत होतो, ते पण तुम्ही लॉकडाऊन करून मोडून पाडत आहात. आता आमच्यासमोर मरण आहेच फक्त कोरोनाने मरायचे, उपाशीपोटी मरायचे की हार्ट अटॅकने मरायचे एवढेच बाकी आहे. तुमची घराणेशाही, सत्तेची आणि पैशांची भूक भस्म्यारोगा सारखीच आहे. अशा शब्दांत राजकीय नेत्यांवर टीका करण्यात आली आहे.
समाजमाध्यमावरील संदेश
>> काल गोकुळात रंग खेळले हरी, नागरिका आता जपून रहा तुझ्या घरी, नाही तर जाशील देवाघरी
>> गोकुळ लयच मोठं हाय की राव! आयपीएल पण इलेक्शन झाल्यावर रद्द केली.
>> पाऊस पण गोकुळच्या इलेक्शनसाठी थांबला होता की का?