आम्ही वेळ घालवायला आलो का ?

By Admin | Published: December 24, 2014 09:37 PM2014-12-24T21:37:53+5:302014-12-25T00:17:55+5:30

शिल्पा ठोकडे : आजऱ्यातील वाहतुकीची कोंडी, अतिक्रमणाबाबत‘बांधकाम’ला सुनावले

Did we come out to spend time? | आम्ही वेळ घालवायला आलो का ?

आम्ही वेळ घालवायला आलो का ?

googlenewsNext

आजरा : ग्रामपंचायतीने निदर्शनास आणून देऊनही वाहतुकीला अडथळा होतील, अशी बांधकामे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्त्याशेजारी होत असतील आणि संबंधित अधिकारी जर आपण अशी बांधकामे करणाऱ्यांना नोटिसा लागू केल्या आहेत, अशी मोघमात बोगस उत्तरे देत असतील, तर आम्ही येथे वेळ घालवायला बैठकीला आलो नाही, अशा शब्दांत तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे यांनी सार्वजनिक बांधकामसह पंचायत बांधकाम विभागाला सुनावले.
आजरा शहरात वाहतुकीची होणारी कोंडी, रस्त्यावर झालेली अतिक्रमणे या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत पदाधिकारी, पोलीस निरीक्षक सी. बी. भालके, गटविकास अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग यांची संयुक्त बैठक आजरा येथे तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी त्या बोलत होत्या.
प्रास्ताविकामध्ये ग्रामविकास अधिकारी राजन दड्डीकर यांनी ग्रामपंचायतीवर अतिक्रमणे हटविणे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असणाऱ्या अतिक्रमित जागामालकांवर कारवाई करणे यावर मर्यादा येत असल्याचे स्पष्ट केले.
अशोक चराटी म्हणाले, शहरामध्ये अनेक ठिकाणी बंद अवस्थेतील वाहने जागीच वर्षानुवर्षे उभी आहेत. मुख्य बाजारपेठेत काही व्यापारी रस्त्यावरच दुकान मांडताना दिसतात.
सार्वजनिक बांधकाम खात्याकडून संबंधितांना वारंवार नोटिसा काढल्या गेल्या असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगत ग्रामपंचायतीला मदत करू, असे स्पष्ट केले. या उत्तराने संतप्त झालेल्या तहसीलदार ठोकडे यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. नोटिसीनंतरची कारवाई का होत नाही? मदत कसली करता? तुमची फक्त कर्तव्ये पार पाडलात तरी खूप झाले, असा टोलाही लगावला.
यावेळी पोलीस निरीक्षक सी. बी. भालके यांनी सदर कारवाई करताना कायद्याचा आधार घ्या. पोलिसांचे सर्व सहकार्य करू, असे स्पष्ट केले.
बैठकीस उपसरपंच मैमुनबी पठाण, उपसरपंच सुलभा कुंभार, कनिष्ठ अभियंता एम. आर. सुतार, एस. टी. जाधव, पी. मानकर, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)


बैठकीतील सूर
सम-विषम तारखेला पार्किं गची सोय करणे.
बंद अवस्थेतील गाड्या हलवणे.
व्यापारी मालवाहतूक गाड्यांना दिवसभर मुख्य बाजारपेठेत बंदी करणे.
आजरा-आंबोली मार्गावरील अतिक्रमणे हटवणे.
मुख्य रस्त्यावर स्पीडब्रेकर व संभाजी चौकात सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवणे.

Web Title: Did we come out to spend time?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.