मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर २६ जूनला धरणे

By admin | Published: June 18, 2014 12:48 AM2014-06-18T00:48:42+5:302014-06-18T00:54:11+5:30

टोलचा प्रश्न : सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीचा निर्णय

Die to the Chief Minister's house on June 26th | मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर २६ जूनला धरणे

मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर २६ जूनला धरणे

Next

कोल्हापूर : टोलविरोधातील लढाई ही कोल्हापूरच्या अस्मितेची व स्वाभिमानाची लढाई असून, त्याची जाणीव राज्य सरकारला करून देण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कऱ्हाड येथील निवासस्थानी एक दिवसाचे लाक्षणिक धरणे धरण्याचा निर्णय आज, मंगळवारी येथे सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीतर्फे घेण्यात आला. अन्यायग्रस्त जनतेला ज्यांनी स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार मिळवून दिला, त्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीदिवशी म्हणजे २६ जून रोजी हे धरणे धरण्यात येणार आहे.
आज सायंकाळी येथील हिंदू एकता पक्षाच्या कार्यालयात कृती समितीची बैठक निवासराव साळोखे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. कोल्हापूर शहरात आयआरबी कंपनीने टोलवसुली सुरू केली असून त्याच्याविरोधात गेल्या चार वर्षांपासून कोल्हापूरकरांनी आंदोलन छेडले आहे. तरीही सरकार टोल रद्द करण्याचा निर्णय घेत नाही. म्हणून आता राज्यकर्त्यांना तसा निर्णय घेण्यास भाग पाडण्याकरिता मुख्यमंत्री चव्हाण यांच्या कऱ्हाड येथील निवासस्थानासमोर धरणे धरण्याचा आग्रह मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर यांनी धरला, त्यावेळी सर्वांनी तो तत्काळ मान्य केला.
शाहू जयंतीदिवशी दसरा चौक येथे पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घातल्यानंतर सर्व आंदोलक विविध वाहनांतून कऱ्हाड येथे मुख्यमंत्री चव्हाण यांच्या घरासमोर जाऊन धरणे धरतील. ज्यांना या धरणे आंदोलनात भाग घ्यायचा आहे, त्यांनी कृती समितीकडे नावनोंदणी करावी, असे आवाहन साळोखे यांनी केले. या आंदोलनात कॉँग्रेस, राष्ट्रवादीसह भाजप-शिवसेना पक्षांच्या कार्यकर्त्यांनीही सहभागी व्हावे आणि कोल्हापूरकरांच्या एकजुटीचे दर्शन घडवावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

Web Title: Die to the Chief Minister's house on June 26th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.